जया बच्चन यांचा स्वभाव अस्थिर असल्यामुळे त्यांना राजकारणात आणू नका, असे अमिताभ बच्चन यांनी आपल्याला सांगितल्याचा दावा बच्चन कुटुंबियांचे एकेकाळचे निकटवर्तीय अमरसिंह यांनी केला. ‘टाईम्स ऑफ इंडिया’ या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा गौप्यस्फोट केला. अमिताभ यांनी जया बच्चन यांच्याविषयी मला धोक्याचा इशारा दिला होता. जया बच्चन यांचा स्वभाव अस्थिर आहे. भारतीय राजकारणात त्यांच्यासारख्या सातत्त्य नसलेल्या व्यक्तीला संधी देणे चुकीचे ठरू शकते, असा सल्ला अमिताभ यांनी आपल्याला दिल्याचे अमरसिंह यांनी सांगितले. मात्र, मी अमिताभ यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करत जया यांना समाजवादी पक्षात प्रवेश मिळवून दिल्याचे अमरसिंह यांनी म्हटले. यानंतर २०१२ मध्ये अनिल अंबानी यांनी आयोजित केलेल्या पार्टीत जया बच्चन आणि अमरसिंह यांच्यात मोठा वाद झाला होता. त्यावेळी अमिताभ यांनी जया यांची बाजू घेतली होती. याच कारणामुळे अमरसिंह आणि अमिताभ यांच्यात वितुष्ट आले होते.
दरम्यान, या मुलाखतीत अमरसिंह यांना अलिकडेच प्रसिद्ध झालेल्या ‘पनामा पेपर्स’मध्ये अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय, अजय देवगण यांची नावे आढळून आल्याविषयी विचारण्यात आले असता त्यांनी या विषयावर बोलणे टाळले.