केंद्र सरकारने लवकरात लवकर जाती आधारित जनगणना करावी तसेच इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावं, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट ) खासदार अमोल कोल्हे यांनी लोकसभेत केली आहे. तसेच त्यांनी विकासाच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारलाही लक्ष्य केलं आहे. ते आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलत होते.

हेही वाचा- “भाजपात जुम्मा-जुम्मा चार दिवस झालेला माणूस मला…”, सभागृहातील राड्यानंतर अंबादास दानवेंचा प्रसाद लाडांवर हल्लाबोल

नेमकं काय म्हणाले अमोल कोल्हे?

“महाराष्ट्रात सध्या आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. मराठा आरक्षणावरून राज्यात मोठा आक्रोश आहे. दुसरीकडे ओबीसींमध्येही आरक्षणावरून चिंता आहे. त्यामुळे माझी सरकारला विनंती आहे की सरकारने जाती आधारित जनगणना करावी तसेच इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावं”, असं अमोल कोल्हे म्हणाले.

हेही वाचा – “मोदीजी लिहून घ्या…”, राहुल गांधींचं भर सभागृहात पंतप्रधानांना आव्हान…

केंद्र सरकारवरही केली टीका

पुढे बोलताना त्यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरून केंद्र सरकारवर टीकाही केली. “राष्ट्रपतींनी त्यांच्या भाषणात सांगितलं की देशात ८० कोटी गरीब नागरिकांना मोफत धान्य दिलं जात आहे, पण आपण पाचवी मोठी अर्थव्यवस्था आहोत हे सांगताना ही बाब अभिमानस्पद आहे का? राष्ट्रपतींनी त्यांच्या भाषणात केंद्र सरकारच्या विकासात्मक योजनांचा उल्लेख केला. मात्र, आज आपल्या देशावर किती कर्ज आहे?” असा प्रश्न अमोल कोल्हे यांनी विचारला.

हेही वाचा – पंकजा मुंडेंना विधान परिषदेची उमेदवारी, देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हण…

“हा शेतकऱ्यांना समृद्ध करण्याचा निर्णय आहे का?”

“राष्ट्रपतींनी त्यांच्या अभिभाषणात ग्रामीण अर्थव्यवस्थेचा उल्लेख केला. मात्र, दुर्दैवाने त्याच दिवशी केंद्र सरकारने दुध पावडर आयात करण्याचा निर्णय घेतला. आज देशात पाण्याची बॉटल २० रुपयाला मिळते. मात्र, शेतकऱ्यांना दुध विकताना २० ते २२ रुपये प्रति लीटर प्रमाणे पैसे मिळतात. हा शेतकऱ्यांना समृद्ध करण्याचा निर्णय आहे का?” असेही ते म्हणाले.