आज देशभरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहाने साजरी केली जात आहे. यानिमित्त अनेक ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. राज्यातील आणि केंद्रातील मंत्र्यांनी देखील विविध ठिकाणी उपस्थित राहत कार्यक्रमांना हजेरी लावली. तर, राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी देखील महाराजांना मानवंदना वाहिली आहे. कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये काही महिन्यांपूर्वी ज्याठिकाणी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती, त्याठिकाणी कोल्हे यांनी महाराजांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक केला.

Shiv Jayanti 2022 : “छत्रपतींचा जन्मदिवस म्हणजे आपल्यासाठी तो सण आहे आणि म्हणून तो…” ; राज ठाकरे यांचं विधान!

“कर्नाटकातील बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती, त्याच बंगळुरूमध्ये आज शिवजयंतीचे औचित्य साधत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करत शिवनामाचा गजर केला,” अशी माहिती राष्ट्रवादीकडून ट्वीट करून देण्यात आली आहे.

दरम्यान, डॉ. अमोल कोल्हे सध्या कर्नाटकमध्ये आहेत. महाराजांच्या बंगळुरूतील पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यापूर्वी त्यांनी होदीगेरे (कर्नाटक) येथील महापराक्रमी शहाजीराजेंच्या समाधीला भेट दिली. “होदीगेरे (कर्नाटक) येथील महापराक्रमी शहाजीराजेंच्या समाधीला भेट देऊन नतमस्तक झालो. ‘शहाजीराजे समाधी स्मारक समितीचे’ स्मारकाच्या उभारणीसाठी कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. मी देखील या स्मारकाच्या उभारणीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे,” अशी माहिती अमोल कोल्हे यांनी दिली.

Shiv Jayanti 2022 : पाहा लाल महालातील शिव जंयती सोहळ्याचे खास फोटो

बंगळुरूत नेमकं काय घडलं होतं?

१८ डिसेंबर २०२१ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची संतापजनक घटना कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथे घडली होती. बंगळुरू येथे घडलेल्या या प्रकाराचे पडसाद राज्यभर उमटले होते. बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याच्या घटनेने शिवप्रेमी चांगलेच संतापले आणि आक्रमक झाले होते. या घटनेनंतर संतापलेल्या शिवप्रेमींनी बेळगावातील धर्मवीर संभाजी चौकात एकत्र येत आंदोलन केलं होतं.

Story img Loader