फक्त घोषणा देऊन भागणार नाही. देशाला सामर्थ्यशाली बनवण्याची गरज आहे, असा कानमंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वपक्षीय खासदारांनी दिला. ते अलाहाबाद येथील भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत बोलत होते. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकारपरिषदेत केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी प्रसारमाध्यमांना मोदींच्या भाषणाचा तपशील सांगितला.
यावेळी मोदींनी स्वपक्षीय नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांचे सार्वजनिक जीवनातील वर्तन कसे असावे, यासंबंधीची सप्तसूत्री सादर केल्याचे जेटलींनी सांगितले. नेत्यांनी सार्वजनिक जीवनात व्यवहार करताना सेवाभाव, संतुलन, संयम, समन्वय, सकारत्मकता, संवेदना आणि संवाद या गोष्टींचे भान राखावे. तुमच्या आचरणात आणि राजकारणात या गोष्टींचे प्रतिबिंब उमटले पाहिजे, असे मोदींनी यावेळी सांगितले.
आपल्यासाठी सत्ता ही आनंदाची गोष्ट नसून एक जबाबदारी आहे. आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षण ही जबाबदारी पार पाडण्यासाठी खर्ची झाला पाहिजे, असे सांगताना मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांचे उदाहरण दिले. शिवाजी महाराजांनी सत्तेकडे कधीही उपभोगाचे साधन न बघता एक जबाबदारी म्हणून बघितले. त्यामुळे ते माझी प्रेरणा असल्याचे मोदींनी म्हटले. मी माझ्या जीवनाचा प्रत्येक क्षण देशाला अर्पण करण्याची शपथ घेतल्याचेही मोदींनी यावेळी म्हटले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा