पीटीआय, नवी दिल्ली
राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान बुधवारपासून महिन्याभरासाठी पुन्हा खुले करण्यात आले आहे. राष्ट्रपती भवनाने ‘एक्स’वर (पूर्वीचे ‘ट्विटर’) प्रसृत केलेल्या निवेदनात नमूद केले, की १६ ऑगस्ट २०२३ ते १७ सप्टेंबर २०२३ या काळात सर्वाना अमृत उद्यान पाहण्यासाठी आमंत्रित करण्यात येत आहे.
१४ ऑगस्ट रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी द्वितीय उद्यान उत्सवाचे उद्घाटन केले. ‘उद्यान उत्सव-२’अंतर्गत अमृत उद्यान १६ ऑगस्ट ते १७ सप्टेंबर २०२३ (सोमवार वगळता) जनतेसाठी खुले राहील. पर्यटक सकाळी १० ते संध्याकाळी ५ पर्यंत (दुपारी ४ ला बागेत अंतिम प्रवेश) या बागेला भेट देऊ शकतात. ‘उद्यान उत्सव-१’अंतर्गत २९ जानेवारी ते ३१ मार्चदरम्यान अमृत उद्यान खुले करण्यात आले होते. त्या वेळी दहा लाखांहून अधिक पर्यटकांनी भेट दिली होती. हे उद्यान यंदा प्रथमच वर्षभरात दुसऱ्यांदा सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले आहे.