खलिस्तानी समर्थक आणि ‘वारिस दे पंजाब’चा प्रमुख अमृतपाल सिंग अद्यापही पंजाब पोलिसांच्या हाती लागला नाही आहे. पंजाब, हरियाणा, दिल्ली पोलीस अमृतपाल सिंगचा शोध घेत आहेत. त्यातच अमृतपाल सिंगचा सहकारी पप्पलप्रीत सिंग याला पोलिसांनी अटक केली आहे. पप्पलप्रीत सिंगच्या अटकेमुळे अमृतपाल सिंगचा ठावठिकाणा लागण्याची शक्यता आहे.
१८ मार्चपासून अमृतपाल सिंग फरार आहे. त्याच्यासह पप्पलप्रीत सिंगही फरार होता. फरार झाल्यानंतर पप्पतप्रीत आणि अमृतपाल सिंग यांचा कोल्ड ड्रिंक पितानाचा फोटो समोर आला होता. तसेच, दोघेही हरियाणातील एक घरी वास्तव्यास राहिल्याचे पोलीस तपासात समोर आलेले होते.
हेही वाचा : “राहुल गांधींचे ‘नको’ त्या उद्योगपतींशी संबंध, ते विदेशात…”; ‘त्या’ ट्वीटवरून गुलाम नबी आझादांचं टीकास्र!
अशातच आज ( १० एप्रिल ) पंजाब पोलिसांनी पप्पलप्रीत सिंगला होशियारपूर येथून ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतल्यावर पप्पलप्रीतला अमृतसरच्या ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अंजला येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणी पप्पलप्रीतवर २३ फेब्रुवारीला गुन्हा दाखल करण्यात आला होता.
१८ मार्चला पंजाब पोलिसांनी अमृतपाल सिंगच्या गावाला घेरले होते. तेव्हा सांगण्यात आले की, अमृतपाल सिंगला अटक करण्यात आली आहे. नंतर अमृतपाल सिंग फरार झाल्याचं पोलिसांनी सांगितलं होते. अमृतपालचे समर्थक आणि सहकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर, अमृतपालचे काका आणि चालकाने स्वत:हा आत्मसमर्पण केले होते.