अमृतसर : पंजाबमधील जहाल धार्मिक नेते अम्रितपाल सिंग यांचा सहकारी आणि अपहरणाच्या गुन्ह्यातील आरोपी लव्हप्रितसिंग तुफान याला शुक्रवारी येथील तुरुंगातून मुक्त करण्यात आले. त्याच्या सुटकेच्या मागणीसाठी गुरुवारी शेकडोच्या जमावाने पोलीस ठाण्यात गोंधळ घातला होता.
पोलिसांनी दाखल केलेल्या अर्जानुसार अजनाला येथील न्यायालयाने लव्हप्रितसिंग याची कोठडीतून सुटका करण्याचे आदेश दिले. त्यानंतर अमृतसर मध्यवर्ती तुरुंगातून त्याची सुटका झाली. खलिस्तानवाद्यांना सहानुभूती असलेल्या अमृतपाल सिंग यांच्या समर्थकांनी गुरुवारी अजनाला पोलीस ठाण्यात घुसून धुडगूस घातला होता. या वेळी काही जणांनी तलवार तसेच बंदुका दाखवत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी लव्हप्रितसिंग याची सुटका करण्याचे आश्वासन त्यांना दिले होते. त्यानुसार पोलिसांनी शुक्रवारी न्यायालयात त्याच्या सुटकेसाठी अर्ज दाखल केला. या अर्जात म्हटले आहे की, ज्या ठिकाणी गुन्हा घडला त्या ठिकाणी लव्हप्रितसिंग हजर नव्हता असे तपासात दिसून आले आहे.
न्यायालयाने सुटकेच्या आदेशात म्हटले आहे की, तपास यंत्रणेला सध्या आरोपीच्या कोठडीची गरज नसल्याने त्याची सुटका करण्यात यावी.
पंथाचा विजय- अम्रितपाल सिंग
न्यायालयाने आरोपी लव्हप्रितसिंग याच्या सुटकेचे आदेश दिल्यानंतर अम्रितपाल सिंग यांनी सांगितले की, हा आमच्या पंथाचा विजय आहे. लव्हप्रित याला खोटय़ा आरोपाखाली तुरुंगात ठेवले होते.
दुबईतून भारतात परतलेले अम्रितपाल सिंह हे वारीस पंजाब दे या संघटनेचे नेतृत्व करतात. त्यांनी गुरुवारी पोलीस ठाण्यातच पत्रकारांशी बोलताना लव्हप्रित याची कोठडीतून सुटका करण्याचा इशारा पोलिसांना दिला होता. लव्हप्रित याच्या सुटकेनंतर त्याला घेऊन अम्रितपाल सिंग यांच्यासह समर्थकांचा ताफा सुवर्ण मंदिरात दर्शनासाठी गेला.