पीटीआय, चंडीगड
खलिस्तानसमर्थक कट्टरपंथी धर्मोपदेशक अमृतपाल सिंगला रविवारी पहाटे पंजाबच्या मोगा जिल्ह्यातील रोडे गावात अटक करण्यात आली. एक महिन्यापासून पंजाब पोलीस त्याच्या मागावर होते. अमृतपालविरुद्ध राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत (रासुका) कारवाई करण्यात आली असून, आसाममधील दिब्रुगढ येथील कारागृहात त्याची रवानगी करण्यात आली आहे.
पंजाबचे पोलीस महानिरीक्षक सुखचैनसिंग गिल यांनी पत्रकार परिषदेत अमृतपालच्या अटकेची माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘अमृतपालला सकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी पोलिसांनी रोडे गावात घेरले. पळण्यासाठी कोणताही मार्ग नसल्याने त्याची कोंडी झाली.’’ कुख्यात खलिस्तानवादी अतिरेकी जर्नेलसिंग भिंद्रनवाले रोडे गावचा रहिवासी होता. गेल्या वर्षी याच गावातील कार्यक्रमात ‘वारीस पंजाब दे’ या संघटनेच्या प्रमुखपदाची सूत्रे अमृतपालकडे सोपवण्यात आली होती. अमृतपालला अटकेनंतर तातडीने विशेष विमानाने दिब्रुगढला नेण्यात आले. दिब्रुगढ तुरुंगात त्याच्या नऊ साथीदारांना ठेवण्यात आले आहे.
अमृतपालच्या अटकेनंतर लगेचच, एक ध्वनिचित्रफीत प्रसारित झाली. त्यातील संक्षिप्त भाषणात तो आत्मसमर्पण करत असल्याचे सूचित करतो. पोलिसांनी मात्र त्याच्या अत्मसमर्पणाचा दावा फेटाळला आहे. पोलीस महानिरीक्षक गिल म्हणाले की, अमृतपालच्या शोध मोहिमेदरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे त्याचा माग काढण्यात आला. तो लपलेल्या रोडे गावाला पोलिसांनी चहुबाजूंनी घेरले आणि त्याला अटक केली. अमृतसर पोलीस आणि पंजाब पोलिसांच्या गुप्तचर शाखेने अटकेची संयुक्त मोहीम राबवली. ज्या गुरुद्वारामध्ये अमृतपाल लपला होता, त्याचे पावित्र्य राखणे अत्यंत गरजेचे असल्याने गणवेशधारी पोलिसांनी आत प्रवेश केला नाही.
आपल्या अटक केलेल्या सहकाऱ्यांची सुटका करण्यासाठी अमृतपाल सिंग समर्थकांनी अजनाला पोलीस ठाण्यावर हल्ला केल्यानंतर पोलिसांनी अमृतपालविरुद्ध कारवाई सुरू केली होती. त्याची शोधमोहीम ३५ दिवस चालली. अमृतपाल १८ मार्चपासून फरार होता. पंजाब पोलिसांनी खलिस्तानसमर्थक अमृतपालविरुद्ध राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या कठोर तरतुदींनुसार कारवाईचा निर्णय घेतला होता. अमृतपाल आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध हत्येचा प्रयत्न, पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि सार्वजनिक सेवकांच्या कर्तव्यात अडथळा आणणे असे अनेक गुन्हे दाखल आहेत.
‘अटक म्हणजे शेवट नसून सुरुवात!’
समाजमाध्यमांत प्रसारित झालेल्या चित्रफितीत अमृतपाल रोडे गावातील एका गुरुद्वारामध्ये एका मेळाव्याला संबोधित करताना आपण शरण जात असल्याचे सांगताना दिसत आहे. हे गाव संत जर्नेलसिंग भिंद्रनवाले यांचे जन्मस्थान आहे. याच ठिकाणी माझा ‘दस्तरबंदी’ (पगडी बांधण्याचा) सोहळा पार पडला होता. आपण आयुष्याच्या निर्णायक वळणावर उभे आहोत. गेल्या महिन्याभरात जे काही घडले, ते सर्व तुम्ही पाहिले आहे. महिन्याभरापूर्वी सरकारने शिखांवर अत्याचार केला. फक्त माझ्या अटकेचा प्रश्न असता, तर मला अटक करण्याचे अनेक मार्ग उपलब्ध होते. मीही सहकार्य केले असते. या भौतिक जगातील न्यायालयात मी दोषी असू शकतो. परंतु सर्वशक्तिमान ईश्वराच्या न्यायालयात मी दोषी नाही. रोडे या गावातच मी संघटना प्रमुखपदाची सूत्रे घेतली होती. तेथेच मी आत्मसमर्पणाचा निर्णय घेतला. ही अटक म्हणजे शेवट नाही, तर सुरुवात आहे, असा दावाही त्याने केला.
शांतताभंग करणाऱ्यांवर कारवाई : मान
चंदीगड : अमृतपाल सिंगच्या अटकेनंतर प्रतिक्रिया देताना पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सांगितले, की पंजाबची शांतता आणि सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई केली जाईल. अमृतपालच्या अटकेसाठी महिनाभर चाललेल्या मोहिमेदरम्यान राज्यात शांतता राखल्याबद्दल मान यांनी पंजाबमधील जनतेचे आभार मानले.
आत्मसमर्पणाचा दावा
दुसऱ्या एका चित्रफितीत अमृतपाल भिंद्रनवालेच्या छायाचित्रासमोर बसलेला दिसत आहे. अकाल तख्तचे माजी जथेदार जसबीर सिंग रोडे यांनी मोगा येथे पत्रकारांशी बोलताना, ‘‘अमृतपालने आत्मसमर्पण केले, त्यावेळी मी उपस्थित होतो. अमृतपालने एका मेळाव्यात भाषण केले आणि नंतर तो आत्मसमर्पणासाठी गुरुद्वारातून बाहेर पडला,’’ असा दावा केला.
कडेकोट सुरक्षाव्यवस्था
दिब्रुगड (आसाम) : पंजाबहून अमृतपालला घेऊन एक विशेष विमान रविवारी दुपारी आसामच्या दिब्रुगड विमानतळावर पोहोचले. तेथून अमृतपालला मध्यवर्ती तुरुंगात नेण्यात आले. या तुरुंगाभोवती आसाम पोलीस, केंद्रीय राखीव पोलीस दल आणि विशेष ‘ब्लॅक कॅट कमांडो’ अशी बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात आहे.