गेल्या काही दिवसांपासून देश पातळीवर अमृतपाल सिंग हे नाव चर्चेत आलं आहे. ‘वारिस पंजाब दे’ या खलिस्तान समर्थक संघटनेचा म्होरक्या असणारा अमृतपाल सिंग सध्या फरार आहे. पंजाब पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. “८० हजारांचा पोलीस फौजफाटा असूनही अमृतपाल सिंग तुमच्या हातून निसटलाच कसा?” असा जाबही पतियाला उच्च न्यायालयाने पंजाब सरकारला विचारला आहे. त्यामुळे एकूणच अमृतपाल सिंग हे नाव सध्या पोलीस यंत्रणेपासून गुप्तहेर खात्यापर्यंत सगळ्यांच्याच हिटलिस्टवर आहे. मात्र, एवढं असूनही अमृतपाल सिंग सापडत नसल्याचं एक कारण त्याच्या पेहेरावात दडल्याचं सांगितलं जातंय.
पोलिसांना चकवा देण्यासाठी अमृतपाल सिंग वेगवेगळे वेश धारण करत असल्याची माहिती पंजाब पोलिसांकडून देण्यात आली आहे. यासंदर्भातला एक व्हिडीओही व्हायरल झाला होता, ज्यामध्ये अमृतपाल सिंगनं काही वेळातच वेगळा वेश धारण करून पोबारा केल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे पंजाब पोलिसांसाठी सध्यातरी अमृतपाल सिंग एक कोडं बनून राहिला आहे. अर्थात, त्याच्या नातेवाईकांकडून अमृतपालला पोलिसांनी आधीच अटक केली आहे, असा दावा केला जात असला, तरी पोलिसांकडून अद्याप त्याचा शोध चालू असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
पंजाब पोलिसांनी नुकतंच अमृतपालचे सात वेगवेगळ्या प्रकारचे लुक शेअर केले आहेत. यामध्ये एका फोटोत अमृतपाल पगडीशिवाय स्टायलिश लुकमध्ये दिसतोय. एका फोटोत पगडीसह ट्रिम केलेली दाढी दिसतेय. एका फोटोत काळ्या पगडीसह अस्ताव्यस्त वाढलेली दाढी दिसतेय. एका फोटोत तर अमृतपालनं दाढी-मिशी पूर्णपणे सफाचट करून लुक बदलला आहे.
अमृतपाल सिंगनं पुन्हा बदलला लुक?
अमृतपाल सातत्याने लुक बदलत असल्यामुळे त्याचा ठावठिकाणा लावणं कठीण जात असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे पोलिसांकडे असलेल्या त्याच्या सर्व लुकचे फोटो पोलिसांनी माध्यमांकडे शेअर केले आहेत.
“अमृतपाल सिंगचे वेगवेगळ्या वेशातले अनेक फोटो आहेत. आम्ही ते सगळे फोटो शेअर करत आहोत. यामुळे त्याला लवकरात लवकर अटक करण्यासाठी मदत होऊ शकेल”, अशी माहिती पंजाबच आयजीपी सुखचेन सिंग गिल यांनी माध्यमंना दिली.
पोलिसांना चकवा देण्यासाठी अमृतपाल सिंगने बदलली पगडी-कपडे, कार सोडली अन्…; VIDEO समोर
अमृतपाल सिंग फरार घोषित
काही दिवसांपूर्वी अमृतपाल जालंधरमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्याचा काही किलोमीटरपर्यंत पाठलागही केला. मात्र, त्याचवेळी अमृतपाल सिंगनं वेश बदलून पोबारा केल्यानंतर त्याला फरार घोषित करण्यात आलं आहे.