खलिस्तान समर्थक आणि ‘वारिस दे पंजाब’चा सर्वेसर्वा अमृतपाल सिंगला फरार घोषित करण्यात आलं आहे. अमृतपाल सिंगच्या सहकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. पण, अद्यापही अमृतपाल सिंग पोलिसांच्या हाती लागला नाही. अशातच अमृतपाल सिंगचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ हरियाणातील असल्याचं सांगण्यात येत आहे.
नवीन व्हिडीओत अमृतपाल सिंग कुरूक्षेत्रातील शाहाबाद परिसरात रस्त्यावर फिरताना दिसत आहे. या व्हिडीओत अमृतपाल सिंग निळ्या रंगाचा शर्ट आणि काळ्या पॅन्टमध्ये रस्ता ओलांडताना दिसत आहे. त्याच्या हातात एक छोटी पिशवी आणि काळी छत्री दिसत आहे.
हेही वाचा : अदाणीनंतर हिंडेनबर्गच्या निशाण्यावर आता ट्विटरचे माजी संस्थापक, केले धक्कादायक आरोप
दरम्यान, अमृतपाल सिंग आणि त्याचा सहकारी पापलप्रीत सिंग यांना आश्रय दिल्याप्रकरणी बलजीत कौर या महिलेला अटक करण्यात आली आहे. या महिलेला कुरूक्षेत्र येथील शाहबाद परिसरातून अटक केल्याचं पोलिसांनी सांगितलं. बलजीत कौर पापलप्रीतला दोन वर्षापासून ओळखत होती.
हेही वाचा : मोदी आडनाव अवमानावरून राहुल गांधी दोषी, दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर पहिल्यांदाच केलं भाष्य, म्हणाले…
कुरूक्षेत्राचे पोलीस अधीक्षक सुरिंदर सिंग भोरिया यांनी सांगितलं की, “अमृतपाल सिंग आणि त्याचा सहकारी पापलप्रीत सिंग याला शाहबाद येथील घरी आश्रय देणाऱ्या बलजीत कौर या महिलेला रविवारी अटक केली आहे. महिलेला पंजाब पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे,” अशी माहिती भोरिया यांनी दिली.