अमृतसरच्या नंगली गावाजवळील मजीठा रोडवर फायनान्स कंपनीच्या एका कर्मचाऱ्याला लुटल्याची घटना घडली आहे. लुटारू इतक्यावरच थांबले नाहीत त्यांनी त्या कर्मचाऱ्याचे हात कापल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कर्मचाऱ्याच्या बॅगेत फक्त १५०० रुपये होते. जखमी कर्मचाऱ्याला आसपास राहण्याऱ्या नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पलवल विश्वास हा एका फायनान्स कंपनीत दोन वर्षांपासून रिकव्हरीचं काम करत आहे. पलवल मुळचा पश्चिम बंगालचा राहणारा असून आकाश अँवेन्यूमध्ये भाड्याने राहतो. घटनेच्या दिवशी पलवल रिकव्हरी करण्यासाठी मजीठा आणि अमृतसरमधील गावात गेला होता. सोमवारी दुपारी १२.३० वाजता नंगली गावात जाऊन त्याने दोन ठिकाणांहून १५०० रुपये जमा केले. पैसे घेऊन तो परतत होता. मात्र त्याच्या पाळत ठेवलेल्या दोघांनी निर्जन रस्त्यात त्याला गाठलं आणि १५०० रुपये असलेली बॅग खेचली. त्याने प्रतिकार केला असता एकाने त्याचे हात कापले. त्यानंतर जखमी पलवल आरडाओरड करत होता. मात्र जवळपास कुणीच नसल्याने त्याच्या मदतीला कुणीच आलं नाही. अखेर काही तासांनी रस्त्यावरून जाण्याऱ्या काही जणांनी जखमी पलवलला पाहिलं आणि तात्काळ रुग्णालयात दाखल केलं.
कोविड रुग्णालयात बाधित महिलेवर सामूहिक बलात्कार; महिला आयोगाने दिले चौकशीचे आदेश
अमनदीप रुग्णालयात जखमी पलवलवर १२ तास शस्त्रक्रिया चालली. त्यानंतर डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करून हात जोडला आहे. आता त्याची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल केला असून पोलीस सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेत आहेत.