गुजरात डेअरी को-ऑपरेटिव्ह अमूलने दुधाच्या दरात वाढ करत असल्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार दुधाचे दर प्रति लिटर मागे तीन रुपयांनी वाढले आहेत आणि हे नवीन दर तत्काळ लागू करण्यात आले आहेत.
नवे दर लागू झाल्याने अमूल गोल्ड दुधाची किंमत ६६ रुपये प्रति लिटर, अमूल ताजा दुधाची किंमत ५४ रुपये प्रति लिटर, अमूल गायीच्या दुधाची किंमत ४६ रुपये प्रति लिटर आणि अमूल ए2 म्हशीच्या दुधाची किंमत आता ७० रुपये प्रतिलिटर झाली आहे.
कामकाजाचा आणि दुधाचे उत्पादन प्रक्रियेचा एकूण खर्च वाढल्यामुळे ही दरवाढ करण्यात आली आहे. केवळ गुरांचा चाऱ्याचा खर्च अंदाजे २० टक्क्यांपर्यंत वाढला असल्याचे सांगण्यात आले आहे.
अमूलने मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये दुधाच्या किंमतीत दोन रुपयांची वाढ केली होती. लम्पी या आजारामुळे दूध उत्पादन आणि वितरणावर परिणाम झालेला आहे. हा आजार म्हैस, गाय तसैच बैलांना होतो. याच कारणामुळे राजस्थान, गुजरात, पंजाब येथील दूध उत्पादनावर परिणाम झालेला आहे. येतील दूध उत्पादन ४५ टक्क्यांनी घटले आहे. या राज्यांसह देशातील एकून १५ राज्यांत लम्पी या आजाराचा प्रादूर्भाव आहे. या कारणामुळेही दूध दरात वाढ करण्यात आली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.