पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी गुजरात सहकारी दूध विपणन महासंघाच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाला उपस्थिती लावली. या वेळी त्यांनी गुजरात दौऱ्यात जवळपास २२ हजार ८५० कोटी रुपायंच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात राज्यातील अनेक शेतकरी उपस्थित होते. या मेळाव्याला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारताच्या स्वातंत्र्यानंतर देशात अनेक दूधांचे ब्रॅण्ड्स उदयाला आले. परंतु, अमूलसारखा दुसरा कोणताच ब्रॅण्ड नाही. अमूल ही पशुपालकांची ओळख बनली आहे. अमूल म्हणजे विश्वास, अमूल म्हणजे विकास, अमूल म्हणजे लोकसहभाग, अमूल म्हणजे शेतकरी सबलीकरण, अमूल म्हणजे आत्मनिर्भर भारताची प्रेरणा, अमूल म्हणजे मोठी स्वप्ने, मोठे संकल्प आणि मोठी उपलब्धी.

ते पुढे म्हणाले, दूरदृष्टीने घेतलेल्या निर्णयांनी भावी पिढ्यांचे नशीब कसे बदलले जाते याचे अमूल एक उदाहरण आहे. आज सरकार सहकार समन्वयाचे एक अनुकरणीय मॉडेल आहे. अशा प्रयत्नांमुळेच आज आपण सर्वांत मोठा दूध उत्पादक देश आहोत.

सुवर्ण महोत्सवानिमित्त अहमदाबादेत अमूलने आयोजित केलेल्या प्रदर्शनालाही पंतप्रधानांनी भेट दिली. राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने शेतकऱ्यांचा सहभाग असलेले अनेक सांस्कृतिक कार्यक्रमही यावेळी आयोजित करण्यात आले होते.

जितेंद्र आव्हाडांचा महानंदरवरून टोला

दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही एक एक्स पोस्ट केली आहे. त्यानुसार, महानंद गुजरातला विकले असल्याचा दावा त्यांनी केला आहे. “मुद्दामहून रात्री ट्वीट करीत आहे. उद्या सकाळीच महानंद डेअरीत जा, डेअरीतून दूध विकत घ्या.. देवाला दुधाचा अभिषेक करा, गोड शिरा करा, जेवढं शक्य असेल तेव्हढं गोडधोडही करा… आता हे काय नवीन सांगतो आहे, असं म्हणाल! हे सांगण्याचं कारण म्हणजे, महानंद आता गुजरातला विकलेय! जय हो, महानंद की!”

दरम्यान, देशातील विविध राज्यांत दूध कंपन्यांचे वाद सुरू आहेत. गुजरातच्या अमूल ब्रॅण्डने देशभरातील अनेक राज्यात आपले हातपाय पसरले असल्याने राज्यातील स्थानिक दूध कंपन्यांनी याविरोधात एल्गार पुकारला आहे. कर्नाटकातील नंदिनी दूध कंपनीनेही अमूलविरोधात शड्डू ठोकला होता. तर, महाराष्ट्रातही महानंद या स्थानिक दूध कंपनीची अमूलबरोबर मोठी स्पर्धा आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amul jaisa koi nahi narendra modis statement is in discussion in gujarat while awhad has a big claim about mahanand sgk
Show comments