गेल्या काही महिन्यांपासून महागाईमुळे आधीच सामान्यांना महिन्याचा ताळेबंद मांडताना मोठी कसरत करावी लागत असताना आता पुन्हा एकदा आर्थिक गणित बिघडण्याची शक्यता आहे. देशातील अग्रगण्य दूध उत्पादक कंपनी असलेल्या अमूलनं दुधाच्या किमती वाढवल्या आहेत. अहमदाबाद, गुजरात, दिल्ली, एनसीआर, मुंबई आणि पश्चिम बंगाल या ठिकाणी हे नवे दर लागू होणार असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.
किती रुपयांनी वाढले दर?
अमूल दूध कंपनीकडून दुधाचे दर प्रतिलिटर २ रुपयांनी वाढवण्यात आले आहेत. कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आता अर्धा लिटर अमूल गोल्डची नवीन किंमत ३१ रुपये तर अर्धा लिटर अमूल ताजाची किंमत २५ रुपये झाली आहे. याशिवाय अमूल शक्ती दुधाच्या प्रत्येक अर्धा लिटरच्या पाकिटासाठी २८ रुपये मोजावे लागणार आहेत.
कधीपासून लागू होणार नवे दर?
कंपनीच्या नियोजनानुसार, येत्या १७ ऑगस्टपासून दुधाचे नवे दर लागू होतील. कंपनीने सांगितलेल्या ठिकाणी हे नवे दर तातडीने लागू होणार असल्याचं देखील स्पष्ट झालं आहे. उत्पादन आणि वितरणाचा खर्च वाढल्यामुळे ही दरवाढ करण्यात आल्याचं अमूलकडून सांगण्यात आलं आहे.