कोलंबिया विद्यापीठाचे संशोधन
आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यापासून जवळच फोगो ज्वालामुखीचे स्खलन झाले होते व त्यानंतर तेथून ५५ कि.मी. अंतरावर असलेल्या केप वेर्दी बेटांवर ७३ हजार वर्षांपूर्वी ८०० फूट उंचीच्या त्सुनामी लाटा उसळल्या होत्या याचे पुरावे वैज्ञानिकांना मिळाले आहेत. आता या अॅटलांटिकमधील या ज्वालामुखीच्या २८२९ मीटर उंचीवर असलेल्या शिखराचे स्खलन होण्याची शक्यता असून त्यात २००४ मधील त्सुनामीच्या ११ पट अधिक लोक मरू शकतात. २००४ मध्ये २ लाख ८० हजार लोक आग्नेय आशियात मरण पावले होते. आताच्या लाटा २७० मीटर उंचीच्या असतील असेही सांगण्यात आले, कारण समुद्रसपाटीपासूनची पातळी कमी झाली आहे. अर्थात प्रत्येक वेळी ज्वालामुखीच्या स्खलनात त्सुनामी लाटा निर्माण होतातच असा याचा निष्कर्ष नाही.
ज्वालामुखीचे अचानक स्खलन झाल्याने आजूबाजूच्या बेटांना त्सुनामी किंवा इतर धोके निर्माण होतात असा एक वाद होता त्यावर हा नवा प्रकाश पडला आहे. कोलंबिया विद्यापीठाच्या लॅमाँट डोहर्थी पृथ्वी वेधशाळेचे रिकाडरे रामालो यांनी म्हटले आहे की, फोगो ज्वालामुखीचे अचानक स्खलन झाल्याने महाकाय त्सुनामी लाटा निर्माण झाल्या होत्या असे नेहमी घडत नाही पण ज्वालामुखीचे धोके पाहताना आपण याचा विचार मात्र करणे गरजेचे आहे. ज्वालामुखीचे स्खलन होताना धोके असतात याबाबत दुमत नाही. अलास्का, जपान व इतरत्र गेल्या शेकडो वर्षांत असे ज्वालामुखी स्खलन झाले आहे व त्यातून काही वेळा हानिकारक त्सुनामी लाटा निर्माण झाल्या आहेत. अनेक वैज्ञानिकांच्या मते ज्वालामुखीचे अचानक स्खलन होतच नाही हा वेगळा मतप्रवाह या संशोधनात आहे. २०११ मध्ये फ्रान्समध्ये याबाबत फॉगो ज्वालामुखीच्या स्खलनचा अभ्यास करण्यात आला होता. त्या ज्वालामुखीचे स्खलन हजारो वर्षांपूर्वी झाले होते, पण त्यात दरडी कोसळल्या होत्या. नवीन अभ्यासानुसार फोगो ज्वालामुखीत स्खलनाच्या वेळी १६० घन किलोमीटरचा दगड कोसळला होता व त्यामुळे ८०० फूट लाटा उसळल्या होत्या. केप वेर्दी बेटांवरील सँटियागो या आफ्रिकेतील पश्चिम किनारी भागात संशोधन करण्यात आले. सँटियागो येथे अडीच लाख लोक राहतात व ते फोगोपासून ५५ किलोमीटर अंतरावर आहे. रामलो व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मते सँटियागो येथे २००० फुटांचे दगड सापडले असून ते समुद्र सपाटीपासून ६५० फूट अंतरावर होते. काही दगड हे २५ फूट रुंद व ७७० टन वजनाचे होते. त्यावेळी मोठी लाट उसळून किनाऱ्यावर आली होती व तिची ऊर्जाही फार मोठी होती. ज्वालामुखीचे आणखी स्खलन वेगवेगळ्या ठिकाणी अपेक्षित असले तरी या संशोधनामुळे कुणी घाबरून जाण्याचे कारण नाही. ज्वालामुखीच्या प्रत्येक स्खलनात त्सुनामी लाटा उसळतात असे नाही तर ते फार क्वचित घडते, असे रामलो यांनी म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: An ancient volcanic collapse triggered an 800 foot tsunami wave
Show comments