सिंगापूरमध्ये जन्माला आलेले पण भारतीय वंशाचे असलेले अर्थतज्ज्ञ थरमन शनमुगरत्नम यांनी गुरुवारी सिंगापूरच्या राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली. थरमन हे सिंगापूरचे नववे राष्ट्रपती आहेत. ६६ वर्षीय थरमन पुढील सहा वर्षे सिंगापूरचे राष्ट्रपतीपद सांभाळणार आहेत. सिंगापूरच्या पहिल्या महिला राष्ट्रपती हलिमाह याकोब यांचा कार्यकाळ १३ सप्टेंबर रोजी संपला आहे.
थरमन यांचे सिंगापूरच्या राजकारणात मोठे नाव आहे. सिंगापूरमधील चिनी समाजाचं त्यांना मोठं समर्थन आहे, असे वृत्त इंडिया टुडेने दिलं आहे. २०१९ ते २०२३ दरम्यान त्यांनी मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम पाहिले. २०१५ ते २०२३ दरम्यान सामाजिक धोरणांसाठी समन्वय मंत्री; आणि २०११ ते २०२३ दरम्यान सिंगापूरच्या चलन प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलंय. मे २०११ ते मे २०१९ पर्यंत ते सिंगापूरचे उपपंतप्रधानही होते.
सर्वाधिक मते मिळून राष्ट्रपती पदावर विराजमान
शनमुगरत्नम यांनी १ सप्टेंबर रोजी राष्ट्रापती पदाची निवडणूक जिंकली. मतदानावेळी सिंगापूरमध्ये २० लाखांहून अधिक मते पडली होती. त्यापैकी १७ लाख मेत शनमुगरत्नम यांना मिळाली आहेत. त्यांनी चिनी वंशाचे कोक सॉन्ग आणि टॅन किन लियान यांचा पराभव केला आहे.
सिंगापूरमध्ये आतापर्यंत भारतीय वंशाचे तिसरे राष्ट्रपती
सिंगापूरमध्ये यापूर्वी दोन भारतीय वंशाचे राष्ट्रपती राहिले होते. भारतीय वंशाचे असलेले सेल्लापन रामनाथन हे सिंगापूरचे राष्ट्राध्यक्ष होते. ते सर्वाधिक काळ येथील राष्ट्राध्यक्ष होते. तर, देवर नायर हे १९८१ ते १९८५ या काळात सिंगापूरचे राष्ट्रपती होते. तर, भारतीय वंशाचे तिसरे राष्ट्रपती म्हणून शनमुगरत्नम यांनी शपथ घेतली आहे.