जम्मू-काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यात सुरक्षा रक्षकांना मोठे यश मिळाले आहे. येथे सुरु असलेल्या चकमकीत ४ दहशतवाद्यांना त्यांनी कंठस्नान घातले आहे. येथे दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरु करण्यात आलेली कारवाई अद्यापही सुरुच आहे.


शोपिया जिल्ह्याच्या कपरान बटागुंड क्षेत्रात सुरक्षा रक्षकांना दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर जवानांना तत्काळ शोधमोहिम सुरु केली होती. त्यानंतर दोन्ही बाजूंनी झालेल्या गोळीबारानंतर या परिसराची नाकाबंदी करण्यात आली आहे. या कारवाई ४ दहशतवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश आले आहे. अद्यापही येथे चकमक सुरु असल्याचे सुत्रांकडून कळते.

शुक्रवारीच शोपियामध्ये काही अज्ञात बंदुकधाऱ्या लोकांनी एका माजी विशेष पोलीस अधिकाऱ्यासह (एसपीओ) तीन लोकांचे अपहरण केले होते. तर गेल्याच आठवड्यात दक्षिण काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षकांचे खबरी असल्याच्या संशयावरुन दोन लोकांची हत्या केली होती.