पीटीआय, ओटावा
कॅनडाच्या संसदेने मंगळवारी ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये हरदीप सिंग निज्जरला पहिल्या स्मृतिदिनानिमित्त श्रद्धांजली वाहिली होती. याला उत्तर म्हणून भारतानेही ‘एअर इंडिया’च्या मॉन्ट्रियल-नवी दिल्ली ‘कनिष्क विमान १८२’मधील भ्याड दहशतवादी हल्ल्याचे स्मरण करण्यासाठी २३ जून रोजी कॅनडात कार्यक्रम आयोजित केला आहे. भारतीय वाणिज्य दूतावासाने हा ३९ वा स्मृतिदिन कार्यक्रम आयोजित केला असून, कॅनडातील भारतीय वंशाच्या नागरिकांना दहशतवादाविरुद्ध एकता दाखवण्यासाठी कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
एअर इंडियाचे हे विमान २३ जून १९८५ रोजी लंडनच्या हिथ्रो विमानतळावर उतरण्याच्या ४५ मिनिटांपूर्वी स्फोट झाला. त्यात विमानातील सर्व ३२९ प्रवासी ठार झाले, ज्यात बहुतांश भारतीय वंशाचे कॅनेडियन नागरिक होते.
‘कनिष्का बॉम्बस्फोट’ हा नागरी विमान वाहतुकीच्या इतिहासातील सर्वांत भयंकर हवाई दहशतवादी हल्ला होता. १९८४ मध्ये सुवर्ण मंदिरातील ‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’चा बदला म्हणून हा हल्ला करण्यात आला होता.
हेही वाचा >>>अमेरिकेचे शिष्टमंडळ दलाई लामांच्या भेटीला; चीनचा विरोध डावलून धर्मशाळा येथे दौरा
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये शिख दहशतवादी हरदीपसिंग निज्जर यांच्या हत्येमध्ये भारताचा संभाव्य सहभाग असल्याचा आरोप केला होता. यानंतर खलिस्तानी दहशतवादाच्या मुद्द्यावरून दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला असताना, कॅनडाच्या संसदेने मंगळवारी निज्जरला श्रद्धाजली वाहिली. या पार्श्वभूमीवरच भारताने हा स्मृती कार्यक्रम आयोजित केला आहे. २३ जून रोजी व्हँकुव्हरमधील स्टॅनले पार्कच्या सेपरले मैदानात एअर इंडिया मेमोरियलमध्ये सायंकाळी साडेसहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
दहशतवादाचा सामना करण्यात आघाडीवर
जगाला कनिष्क बॉम्बस्फोटाची आठवण करून देताना भारत दहशतवादाच्या जागतिक धोक्याचा सामना करण्यात आघाडीवर आहे. तसेच दहशतवादासारख्या जागतिक धोक्याचा सामना करण्यासाठी सर्व राष्ट्रांसोबत काम करत असल्याचे भारताच्या व्हँकुव्हरमधील (कॅनडा) वाणिज्य दूतावासाने म्हटले ‘एक्स’वर म्हटले आहे.