पीटीआय, तिरुवनंतपुरम
केरळमधील कलमस्मेरी येथील ख्रिश्चन समाजाच्या ‘झामरा इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर’मध्ये (संमेलन केंद्र) झालेला स्फोट अद्ययावत स्फोटक यंत्रणेमुळे (आयईडी) झाला असल्याची माहिती केरळचे पोलीस महासंचालक (डीजीपी) शेख दरवेश साहेब यांनी रविवारी पत्रकारांना दिली. हा दहशतवादी हल्ला होता का, असे विचारले असता शेख म्हणाले, की आता लगेच याबाबत निश्चित काहीच सांगता येणार नाही. मी तपासानंतरच याचा तपशील सांगू शकतो. आम्ही सर्वंकष तपास करत आहोत. यामागे कोण आहे ते शोधून त्यांच्यावर निश्चित कडक कारवाई करू.
राज्याच्या पोलीसप्रमुखांनी पत्रकारांना सांगितले की, प्राथमिक तपासानुसार हा स्फोट अद्ययावत स्फोटक यंत्रणेद्वारे (आयईडी) झाला होता. आमचा तपास सुरू आहे. आज सकाळी नऊ वाजून ४० मिनिटांनी कलमस्मेरी येथील ‘झामरा इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर’मध्ये स्फोट झाला.राज्यमंत्री व्ही. व्ही. वासवान आणि अँटनी राजू यांनी सांगितले, की येथे दोन स्फोट झाले. तर, एर्नाकुलम काँग्रेसचे खासदार हिबी इडन यांनी सांगितले की, या केंद्रात उपस्थित असलेल्या त्यांच्या मित्राने दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळी अनेक स्फोट झाले. या मंत्र्यांनी सांगितले की, प्राथमिक तपासानुसार दोन स्फोट झाल्याचे त्यांनी आम्हाला सांगितले आहे.
हेही वाचा >>>आंध्र प्रदेशात भीषण अपघात; दोन रेल्वेंची समोरासमोर धडक, तिघांचा मृत्यू, ४० जण जखमी
‘एसआयटी’ची स्थापना
पोलीसप्रमुखांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. शांतता भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. स्फोटाच्या ठिकाणाला भेट दिल्यानंतर याप्रकरणी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी केली.