भारताच्या लसीकरण कार्यक्रमाविषयी सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून आकडेवारी जाहीर करण्यात आली. या आकडेवारीनुसार भारतानं एकूण दिलेल्या डोसच्या संख्येमध्ये अमेरिकेलाही मागे टाकल्याचं सांगत ही ऐतिहासिक कामगिरी असल्याचं देखील नमूद करण्यात आलं. मात्र, ही आकडेवारी दाखवून देतानाच आता उद्योगपती आणि महिंद्रा समूहाचे संचालक आनंद महिंद्रा यांनी नाण्याची दुसरी बाजू दाखवून दिली आहे. त्यासोबतच, लसीकरणाच्या कार्यक्रमात आपण कशा पद्धतीने धोरण ठेवल्यास फायदा होऊ शकतो, याविषयी देखील त्यांनी केंद्र सरकारला सल्ला दिला आहे.
आनंद महिंद्रा हे त्यांच्या ट्वीट्समुळे कायम चर्चेत असतात. वेगवेगळ्या सामाजिक, आर्थिक, क्रीडाविषयक असो वा मनोरंजन क्षेत्राशी संबंधित विषय असो, आनंद महिंद्रा यांनी केलेले ट्वीट कायमच व्हायरल होताना पाहायला मिळतात. करोनासंदर्भात त्यांनी केलेले ट्वीट चर्चेचा विषय ठरलेले असताना आता लसीकरणाविषयी केंद्र सरकार पाठ थोपटून घेत असताना आनंद महिंद्रा यांनी या आकडेवारीची दुसरी बाजू देखील सांगितली आहे.
अमेरिकेत ५४ टक्के नागरिक झाले लसीकृत!
भारतानं अमेरिकेला लसीकरणामध्ये मागे टाकल्याचं एक वृत्त शेअर करताना आनंद महिंद्रा या ट्वीटमध्ये म्हणतात, “ही कामगिरी केल्यानंतर देखील आपण आपल्या लोकसंख्येच्या फक्त १९ टक्के लोकांनाच लस देऊ शकलेलो आहोत. दुसरीकडे अमेरिकेत मात्र हे प्रमाण ५४ टक्के आहे. जगासोबत स्पर्धेत राहण्यासाठी, जगासोबत धावण्यासाठी आपली लोकसंख्या आपल्याला कायम वेगाने धावण्यासाठी प्रवृत्त करते. कदाचित यामुळेच आपण जगातील सर्वात इनोव्हेटिव्ह देश होण्याचे मानकरी ठरू”.
लसीकरणात भारतानं अमेरिकेलाही टाकलं मागे; आजपर्यंत दिले ३२ कोटी ३६ लाख डोस! – वाचा सविस्तर
India taking a distinct lead in total vaccine doses administered in the world. Surpassing the US, India took 163 days to reach the 32 crore benchmark. The US took 193 days: Union Health Ministry pic.twitter.com/d3sFCarg9i
— ANI (@ANI) June 29, 2021
गेल्या आठवड्याभरापासून म्हणजेच २१ जूनपासून देशात १८ ते ४४ या वयोगटासाठी देखील केंद्र सरकारकडून मोफत लसीकरणाची सुरुवात करण्यात आली. पहिल्याच दिवशी ८३ लाख नागरिकांना लस देण्यात आली. त्यामुळे गेल्या आठवड्याभरात लसीकरणाचा वेग वाढला असून ताज्या आकडेवारीनुसार भारतानं डोसच्या संख्येमध्ये अमेरिकेलाही मागे टाकलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार भारतात आज २८ जून २०२१ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत ३२ कोटी ३६ लाख ६३ हजार २९७ लसीचे डोस देण्यात आले आहेत. हा जगात सर्वाधिक लसीकरणाचा आकडा असून ही ऐतिहासिक कामगिरी असल्याचं वर्णन केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी केलं आहे.