भारतीय वंशाचे नागरिक आणि ब्रिटनमधील हुजूर पक्षाचे नेते ऋषी सुनक यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड करण्यात आली आहे. ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्याने सुनक यांचा विजय जवळजवळ निश्चित झाला. जॉन्सन यांनी माघार घेतल्यानंतर सुनक यांचे प्रतिस्पर्धी म्हणून पेनी मॉर्डन्ट यांच्याकडे पाहिलं जात होतं. मात्र, सत्ताधारी हुजूर पक्षाच्या खासदारांनी सुनक यांना पाठिंबा दिल्यामुळे त्यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी वर्णी लागली आहे.
भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांची ब्रिटनच्या सर्वोच्च पदी निवड झाल्याने त्यांच्यावर भारतासह जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. दरम्यान, भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही ट्वीट करत ऋषी सुनक यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ब्रिटनचे माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी भारताबाबत केलेल्या एका विधानाचा हवाला देत आनंद महिंद्रा यांनी हटके शुभेच्छा दिल्या आहेत.
१९४७ साली भारत देश स्वतंत्र्याच्या उंबरठ्यावर असताना तत्कालीन ब्रिटनचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी भारतीय नेत्यांची खिल्ली उडवली होती. सर्व भारतीय नेते कमी गुणवत्तेचे आणि अप्रभावी असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. आज, भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात, आपण भारतीय वंशाच्या एका व्यक्तीला ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान होताना पाहण्यास तयार आहोत, अशा आशयाचं ट्वीट आनंद महिंद्रा यांनी केलं आहे. त्याचं हे ट्वीट सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतं आहे.