दिल्लीतील राष्ट्रपती भवनात सोमवारी पद्म पुरस्काराच्या मानकऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुरस्कार मिळणाऱ्यांमध्ये वाराणसीचे १२६ वर्षीय स्वामी शिवानंददेखील होते. योगा क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल त्यांना पद्म पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. दरम्यान पुरस्कार घेण्याआधी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच राष्ट्रपतींसमोर नतमस्तक होत सर्वांना भारावून टाकलं. स्वामी शिवानंद यांचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून आनंद महिंद्रा यांनीही त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल समाधान व्यक्त केलं आङे.
वाराणसीचे १२६ वर्षीय स्वामी शिवानंद यांना भारतीय जीवनपद्धतीत आणि योगाच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. सोमवारी हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी स्वामी शिवानंद पोहोचले तेव्हा त्यांनी सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नमस्कार केला. स्वामी शिवानंद यांची ही कृती पाहून पंतप्रधान मोदींनीही नतमस्तक होऊन नमस्कार केला. यानंतर स्वामी शिवानंद यांनी रेड कार्पेट आणि स्टेजजवळ दोनदा डोके टेकून रामनाथ कोविंद यांनाही नमस्कार केला.
यानंतर राष्ट्रपती कोविंद आपल्या खुर्चीवरून उठले आणि त्यांनी स्वामी शिवानंद यांना उभे केले आणि पद्मश्री देत सन्मानित केलं. राष्ट्रपती कोविंद यांनीही स्वामी शिवानंद यांच्यासोबत हसत संवाद साधला. स्वामी शिवानंद यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
स्वामी शिवानंद यांना पुरस्कार मिळाल्यानंतर महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा यांनीदेखील कौतुक केलं असून हीच योगाची ताकद असल्याचं म्हटलं आहे. ट्वीट करत ते म्हणाले आहेत की, “हीच योगाची ताकद आहे. १२५ वर्षांच्या समर्पणाचे आयुष्य! स्वामी शिवानंद यांची वागणूक आणि प्रतिष्ठा नम्र आणि प्रेरणादायी आहे. योगाचा उगम झालेल्या देशाचे नागरिक असल्याचा अभिमान आहे”.
कोण आहेत स्वामी शिवानंद?
स्वामी शिवानंद यांचा जन्म ८ ऑगस्ट १८९६ रोजी बंगालच्या श्रीहट्टी जिल्ह्यात झाला. त्यांच्या आई-वडिलांचे उपासमारीने निधन झाले होते, तेव्हापासून शिवानंद यांनी अर्ध्या पोटी जेवण्याचे व्रत घेतले, ते आजपर्यंत पाळत आहेत. काही काळानंतर त्यांनी बंगालमधून काशी गाठली आणि येथे गुरु ओंकारानंद यांच्याकडून शिक्षण घेतले. १९२५ मध्ये, ओंकारानंद यांच्या आदेशानुसार, ते जगाच्या दौऱ्यावर गेले. त्यांनी सुमारे ३४ वर्षे देश-विदेशात प्रवास केला.
आश्रमात दीक्षा घेतल्यानंतर १९७७ मध्ये ते वृंदावनला गेले. दोन वर्षे वृंदावनात राहिल्यानंतर ते १९७९ मध्ये वाराणसीला आले. तेव्हापासून ते इथेच राहत आहेत. स्वामी शिवानंद अनेक देश फिरले आहेत. विमानतळावरही त्यांना एवढ्या वयात कोणाचाही आधार न घेता फिरताना पाहून लोक आश्चर्यचकित होतात.
वाराणसीमध्ये काही वर्षे राहिल्यानंतर त्यांनी लोकांना योग आणि निरोगी दिनचर्यासाठी प्रेरित करण्यास सुरुवात केली. काशीबद्दल ते म्हणतात की ती पवित्र भूमी आहे तशी तपोभूमी आहे. येथे भगवान शंकर स्वतः वास करतात, त्यामुळे त्यांना येथे राहण्यास आवडते. स्वामी शिवानंद यांना योग आणि धर्माचे खूप सखोल ज्ञान आहे.