Anant Ambani Padyatra Jamnagar to Dwarka : देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचे धाकटे पुत्र अनंत अंबानी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी ते त्यांच्या पदयात्रेमुळे प्रसारमाध्यमांवर झळकत आहेत. त्यांनी गुजरातमधील जामनगर येथील त्यांच्या निवासस्थानापासून द्वारकेपर्यंतची पदयात्रा सुरू केली आहे. त्यांच्या या पदयात्रेचा आजचा सहावा दिवस आहे. ते दररोज रात्री अनेक किलोमीटर पायी चालतात आणि दिवसा विश्रांती घेतात.
या पदयात्रेदरम्यान, अनंत अंबानी वाटेत येणाऱ्या प्रत्येक मंदिरात जाऊन दर्शन घेत आहेत, प्रार्थना करत आहेत. या पदयात्रेच्या माध्यमातून त्यांनी देशातील तरुणांना एक खास संदेश देखील दिला आहे.
प्रत्येक रात्री १० ते १२ किमी प्रवास
अंबानी कुटुंबाची भगवान द्वारकाधीशांवर श्रद्धा आहे. या कुटुंबातील सर्वच सदस्य त्यांच्या आयुष्यात मोठी घटना घडल्यास, एखादं काम पूर्ण झाल्यास, शुभ काम करण्यापूर्वी द्वारकाधीशांच्या दर्शनाला जातात. या महिन्यात अनंत अंबानी यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त अनंत अंबानी द्वारकाधीशांच्या दर्शनासाठी निघाले आहेत. मात्र, अनंत अंबानी हे त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांप्रमाणे कारने किंवा खासगी हेलिकॉप्टरने नव्हे तर पायी निघाले आहेत. त्यांनी जामनगर ते द्वारका अशी पदयात्रा सुरू केली आहे. या पदयात्रेत ते प्रत्येक रात्री १० ते १२ किलोमीटर पायी चालत आहेत. दरम्यान, वाटेत येणाऱ्या मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेत आहेत.
पदयात्रेचं कारणही आहे खास
अनंत अंबानी यांच्या पदयात्रेचा आजचा सहावा दिवस आहे. ते आतापर्यंत ६० किलोमीटरपर्यंत चालले आहेत. आज विश्वनाथ वेद संस्कृत शाळेत त्यांचं स्वागत करण्यात आलं. १० एप्रिलला त्यांचा ३० वा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त त्यांना द्वारकाधीशांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत.
अनंत अंबानींचा तरुणाना खास संदेश
या पदयात्रेच्या माध्यमातून अनंत अंबानी यांनी देशातील तरुणांना सनातन संस्कृतीप्रति आस्था बाळगण्याचा संदेश दिला आहे. अनंत अंबानी म्हणाले, “द्वारकाधीशांच्या आशीर्वादाने मला शक्ती मिळाली आहे आणि मी दररोज चालत आहे. पाच दिवसांपासून मी चालत आहे. पुढच्या पाच दिवसांत मी द्वारकाधीश मंदिरात दाखल होईन आणि भगवान द्वारकाधीशांचे दर्शन घेईन.”
दिवसा पदयात्रा काढली तर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल, तसेच सध्या उन्हाळ्याचे दिवस असून दिवसा इतकं चालणं सोपं नाही. यामुळे अनंत अंबानी यांनी रात्री प्रवास करण्याचा निर्णय घेतला आहे.