अवजड उद्योग या सारखे दुय्यम दर्जाचे खाते मिळाल्यामुळे नाराज असलेल्या शिवसेनेने आपली बंडाची तलवार म्यान केली असून, बुधवारी पक्षाचे मंत्री अनंत गीते आपल्या खात्याचा कार्यभार स्वीकारला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये बुधवारी सकाळी सकारात्मक चर्चा झाल्यामुळे आपण पदभार स्वीकारण्यासाठी जात असल्याचे अनंत गीते यांनी दिल्लीत पत्रकारांना सांगितले. मंत्रिमंडळाच्या पुढील विस्तारात शिवसेनेला आणखी मंत्रिपद मिळणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
लोकसभा निवडणुकीत १८ जागा जिंकूनही अन्य सहकारी पक्षांच्या तुलनेत केंद्रीय मंत्रिमंडळात दुय्यम दर्जाचे खाते मिळाल्याने शिवसेना नाराज आहे. एकच मंत्रिपद मिळाल्याने आधीच खट्ट झालेल्या शिवसेनेच्या वाटय़ाला अवजड उद्योग मंत्रालय सोपवण्यात आल्याने मंगळवारी ही नाराजी उघडपणे समोर आली. त्यामुळे या खात्याचे मंत्री अनंत गीते यांनी मंगळवारी पदभारच स्वीकारला नव्हता. तसेच याबाबतचा अंतिम निर्णय उद्धव ठाकरे यांच्यावर सोपवला होता.
नव्या सरकारच्या शपथविधीला पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना निमंत्रण देण्यात आल्याने आधीच शिवसेनेत नाराजीचा सूर उमटला होता. मात्र, त्यावेळी भाजपच्या दटावणीनंतर पक्षनेतृत्वाला नमते घ्यावे लागले व या सोहळय़ातच शिवसेनेचे अनंत गीते यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथही घेतली. मात्र, मंगळवारी जाहीर झालेल्या खातेवाटपानंतर शिवसेनेची नाराजी तीव्र झाली होती. गीते यांना अवजड उद्योग हे बिनमहत्त्वाचे खाते देण्यात आले आहे. या पाश्र्वभूमीवर शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी अनंत गीते यांच्याशी दिल्लीत चर्चा केली. त्यानंतर गीते यांनी आपल्या खात्याचा पदभारच स्वीकारला नव्हता. यासंदर्भात उद्धव ठाकरे बुधवारी निर्णय घेतील, असेही गीतेंनी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते

Story img Loader