सतत वादग्रस्त विधाने करुन चर्चेत रहाणारे केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे यांनी आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल अत्यंत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. राहुल गांधी यांना धर्माबद्दल काहीही माहिती नाही. ते खोटं बोलतात. मुस्लिम पिता, ख्रिश्चन आईचा मुलगा कसा काय ब्राह्मण असू शकतो ? असे वादग्रस्त विधान हेगडे यांनी केले.
आपण असे मुद्दे समजू शकतो पण रिकाम्या डोक्याच्या माणसाला हे समजणार नाही. असा हायब्रिड नमुना तुम्हाला जगाच्या कुठच्याही प्रयोगशाळेत सापडणार नाही. या देशात फक्त काँग्रेसच्या प्रयोगशाळेत तुम्हाला अशा प्रकारचा हायब्रिड नमुना सापडेल. जिथे वडिल आणि मुलगा दोघे वेगवेगळया प्रकारचे आहेत असे वक्तव्य अनंतकुमार हेगडे यांनी केले.
तुम्ही खोटे बोलत असाल तर ते अशा पद्धतीने बोला की, लोकांना त्यावर विश्वास बसला पाहिजे. फक्त दोन ते तीन महिन्यांचा विषय उरला आहे. सर्वजण घरी जातील. राहुल गांधी कदाचित कोलंबियाला जातील असे हेगडे म्हणाले.
रविवारी अनंत कुमार हेगडे यांनी हिंदू मुलींना स्पर्श करणाऱ्या अन्य धर्मीयांचे हात हिंदू तरुणांनी तोडून टाकले पाहिजेत असे विधान केले होते. अन्य धर्मातल्या मुलांनी हिंदू मुलींना स्पर्श केला तर हिंदू मुलांनी ते हात तोडून इतिहास रचण्यासाठी सज्ज रहावे असे विधान हेगडे यांनी केले होते.