ग्रेटर कैलाश. दिल्लीच्या दक्षिण भागातील उच्चभ्रूंची मोठी वसाहत. अर्थमंत्री अरुण जेटलीदेखील याच भागातले. दिल्लीचा सर्वात महागडा परिसर. सामान्य जनांना भेडसावणाऱ्या समस्या या परिसरात राहणाऱ्यांना माहीत नसतात. पाणीटंचाई.. विजेची कमतरता.. खराब रस्ते वगैरे.. अशा मध्यमवर्गीय अपेक्षा या भागातील लोकांच्या कधीही नसतात. दिवसा महागडय़ा गाडय़ांची रस्त्यावर वर्दळ तर रात्री चंदेरी दुनियेचा लखलखाट या भागात असतो! शुक्रवारी दुपारी कैलाश सत्यार्थी यांना नोबेल पुरस्कार घोषित होईपर्यंत या भागाचे हेच चित्र होते. नोबेल शांतता पुरस्कार जाहीर होताच आपल्याच कोषात रमलेल्या या उच्चभ्रूंच्या वस्तीला भान आले.
समाजाशी फारशे देणे-घेणे नसलेल्या संप्रदायाची वसाहत असे वर्णन ग्रेटर कैलाश, ईस्ट ऑफ कैलाश, कालकाजी या भागाचे केले जाते. त्याच भागात आहे बाल हक्क चळवळीचे आतंरराष्ट्रीय प्रवर्तक कैलाश सत्यार्थी यांचे निवासस्थान! सत्यार्थी म्हणजे स्वामी अग्निवेश यांचे चेले. कुठल्याशा कारणास्तव अग्निवेश व त्यांच्यात वाद झाले. सत्यार्थी यांनी स्वतंत्र आंदोलन सुरू केले. ‘बचपन बचाओ’ या नावाने. याच संस्थेशी संबंधित पोस्टर्स सत्यार्थी यांच्या तीन मजली घराच्या भिंती-भिंतीवर पसरली आहेत. कुठे वीटभट्टी तर कुठे विडी वळणारे बालकामगार! कचरा वेचणाऱ्या लहान मुलांची तर किती तरी पोस्टर्स. सत्यार्थी यांच्या घराची प्रत्येक भिंत लहान मुलांचे हरवलेले बालपण कोण परत करणार, असा प्रश्नच येणाऱ्या-जाणाऱ्यांना विचारत होती. ट्विटरवर अवघे ६० फॉलोअर्स असलेल्या सत्यार्थी यांना नोबेल घोषित होताच ही संख्या साडेसात हजारांवर पोहोचली. व्हच्र्युअल जगात वावरणाऱ्यांसाठी सत्यार्थी हे तोवर अपरिचितच होते. तीच स्थिती प्रसारमाध्यमांची. दिल्लीच्या राष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी तर कधी काळी सत्यार्थी यांच्यावर बहिष्कार टाकला होता. सहा महिने परदेशात राहून भारतात समाजसेवा करणारा समाजसेवक, असा आरोप सत्यार्थी यांचे विरोधक त्यांच्यावर करतात. पण नोबेल पुरस्कार घोषित झाल्यानंतर सत्यार्थी यांच्या घरासमोर प्रसारमाध्यमांची गर्दी उसळली होती. देशीच नव्हे तर जगभरातील प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी रेटारेटी करून सत्यार्थी यांच्या ‘लाइव्ह’साठी धडपडत होते. प्रत्येक प्रसारमाध्यमाची वेळ ठरलेली. एका फलकावर ठळक काळ्या अक्षरात वाहिनीचे नाव व दिलेली वेळ लिहिलेली होती. रात्री दहापर्यंत सत्यार्थी विविध वृत्तवाहिन्यांवरून देशवासीयांशी बोलणार होते. सत्यार्थी यांच्या निवासस्थानाच्या तीनही मजल्यावर अत्याधुनिक सोयींनी परिपूर्ण एक छोटेखानी कॉन्फरन्स रूम आहे. त्यात त्यांच्या संस्थेशी संबंधित नियमित बैठका होत असतात. सत्यार्थी यांच्या सभोवती प्रसारमाध्यमांचा गराडा. त्यातील काही ओळखीचे असतात. गर्दीतून कशीबशी वाट काढत ‘द हिंदू’च्या ज्येष्ठ महिला पत्रकार समोर येतात. सत्यार्थीना दूरध्वनी जोडून देतात. कम्युनिस्ट नेते सीताराम येच्युरींच्या शुभेच्छा स्वीकारून सत्यार्थी तो बंद करतात. पत्रकारांच्या ठोकळेबाज प्रश्नांना विनम्र भावनेने उत्तर देऊन सत्यार्थी नोबेल पुरस्कार देशवासीयांना समर्पित करीत असल्याची भावना व्यक्त करतात. दुसऱ्या मजल्यावर तोबा गर्दी असते. पहिल्या मजल्यावर साधारण येणाऱ्या-जाणाऱ्यांची व्यवस्था. तेथे सत्यार्थी यांच्या सहधर्मचारिणी पत्रकारांशी बोलत असतात. ‘बचपन बचाओ’मुळे जोडलेल्या असंख्य सहकाऱ्यांची सत्यार्थी यांच्या घरी रीघ लागलेली असते. सत्यार्थी यांच्यामुळे ज्यांचं बालपण परत मिळालं असे कोवळे हातही गर्दीत असतात. ते हात हातात घेऊन सत्यार्थी कृतकृत्य होतात. कॅमेऱ्यांचा लखलखाट घरभर पसरतो. स्वीय सहायक उद्याचे नियोजन ठरवत असतो. त्या नियोजनात गाझियाबाद, नोईडा, गुडगाव, हरयाणा व दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेवर ‘बचपन बचाओ’साठी काम करणाऱ्या सहकाऱ्यांच्या भेटी असतात. शिवाय दूरध्वनी करणाऱ्या प्रत्येकाचे नाव, शहर, मोबाइल क्रमांक स्वीय सहायक लिहून घेतात. सत्यार्थी यांच्या स्वयंसेवी संस्थेचे दोन डझन कर्मचारी येणाऱ्या प्रत्येकाशी अदबीने संवाद साधतात. ना पोलिसांचा गराडा ना सुरक्षारक्षकांची धावपळ! सत्यार्थी यांचे निवासस्थान आता प्रेरणास्रोत बनले आहे.
.. आणि उच्चभ्रूंच्या वस्तीला भान आले
ग्रेटर कैलाश. दिल्लीच्या दक्षिण भागातील उच्चभ्रूंची मोठी वसाहत. अर्थमंत्री अरुण जेटलीदेखील याच भागातले. दिल्लीचा सर्वात महागडा परिसर. सामान्य जनांना भेडसावणाऱ्या समस्या या परिसरात राहणाऱ्यांना माहीत नसतात.
First published on: 11-10-2014 at 04:19 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: And greater kailash elit colony awaken