* अफजलच्या कुटुंबीयांचा आक्रोश * निवडणुका जवळ आल्यानेच फाशी दिल्याचा आरोप
तबस्सुम सोपोरच्या शुश्रूषा गृहात सर्व काही ठीक असल्याची खातरजमा करून घेत होती. तिचा चौदा वर्षांचा मुलगा गालिब हा बारामुल्लातील खानापोरा येथे नातवाइकांकडे गेला होता. गुलाम अहमद बुहरू हे सकाळी चहाबरोबर खाण्यासाठी ब्रेड आणायला गेले होते. बशीर अहमद गुरू हे सकाळी नमाजासाठी मशिदीत गेले होते. तेवढय़ात अफजल गुरूला फाशी दिल्याची बातमी आली. त्याची पत्नी तबस्सुम, मुलगा गालिब, सासरे बुहरू व बंधू गुरू यांना हा धक्काच होता. ही फेसबुकवरची अफवा आहे असे सुरुवातील त्यांच्या नातेवाईक व मित्रमंडळींनी सांगितले. पण ती अफवा नव्हती तिहार तुरुंगात खरोखर अफजलला फाशी देण्यात आले होते. सर्व आशा मावळल्या होत्या. नंतर अर्धा तासातच बातमी खरी असल्याचे वृत्तवाहिन्यांवरून समजले. अफजलला शनिवारी सकाळी फाशी देण्यात येणार आहे याबाबत आम्हाला अंधारात ठेवले अशी त्याच्या नातेवाइकांची तक्रार होती.
अफजलचा भाऊ अजाज अहमद गुरू याने ‘द संडे एक्स्प्रेस’ला सांगितले, की मला नातेवाइकांचा फोन आला, त्यांनी ‘लवकर घरी ये’ असे ते म्हणाले. घरी आलो तर अफजलला फाशी दिल्याची अफवा असल्याची माहिती त्यांनी दिली. हे खरे आहे यावर विश्वास बसत नव्हता. पण वृत्तवाहिन्यांवरून बातमी खरी असल्याचे समजले.
तोपर्यंत अफजल गुरूचे मूळ गाव असलेल्या दोआबागची केंद्रीय राखीव पोलिस दल, पोलिस व लष्कर यांनी नाकांबदी केली होती. कुणालाच गावात येऊ देत नव्हते. काही लोकांवर गोळ्या झाडण्यात आल्या. त्यात किमान पाच लोक जखमी झाले.
आजूबाजूचे लोक अफजलची पत्नी तबस्सुम हिच्याभोवती गोळा झाले, पण ती कुणाशीही बोलली नाही. गालिब हा अफजलला अटक झाली त्या वेळी दोन वर्षांचा होता. मला बाबांना नुसते बघायचे होते असे गालिब म्हणाला. गालिब सध्या आजोबांबरोबर बारामुल्लात आझाद गंज येथे राहत आहे. गालिबचे काका एजाज म्हणाले, की अफजलचा मृतदेह ताब्यात दिला नाही तर आम्ही उपोषण करू, त्याचा मृतदेह ताब्यात द्यावा एवढीच आमची मागणी आहे.
अफजलचे सासरे बुहरू यांना अफजलच्या फाशीची बातमी एका नातेवाइकाने सांगितली, तेव्हा आता तबस्सुमला हे कसे सांगायचे हा प्रश्न आपल्याला पडला आहे, एका नातेवाइकालाच ही बातमी तबस्सुमला सांगण्याची जबाबदारी दिल्याचे ते म्हणाले.
‘आपण पोलिस स्टेशनला फोन करून अफजलच्या दोआबाग या मूळ गावी जाऊ देण्याची परवानगी मागितली पण ती नाकारण्यात आली. नंतर खासगी मोटारीने आपण १५ किमी अंतरावर असलेल्या या गावात गेलो, असे बुहरू म्हणाले. आम्ही रक्षाबंधनला अफजलला भेटलो, ती साधीच भेट होती. त्याला अशा प्रकारे फाशी दिले जाईल याची आम्हाला कल्पना नव्हती. जर सरकारने कल्पना दिली असती, तर आम्ही एकदा त्याला भेटलो असतो. ही कसली लोकशाही आहे. त्यांनी अफजलला त्याची शेवटची इच्छाही विचारली नाही. केंद्र सरकार व गृहमंत्री खोटे बोलत आहेत, त्यांनी आम्हाला अफजलच्या फाशीविषयी सांगितले नव्हते.निवडणुका जवळ आल्याने काँग्रेस सरकारने अफजलला फाशी दिले’ असा आरोप त्यांनी केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा