मुस्लिम समाजातील लोकांनी स्वतःचे छायाचित्र काढणे धर्मविरोधी कृत्य आणि पाप असल्याचा फतवा दारूल उलूम देवबंदने काढलाय. एकीकडे सौदी अरेबियामध्ये मक्का शहरात छायाचित्रकारांना छायाचित्रे घेण्यास परवानगी आहे. त्याचबरोबर तेथील नमाजाचे थेट प्रक्षेपण जगभरातील वाहिन्यावरून केले जाते. त्यापार्श्वभूमीवर हा नवा फतवा काढण्यात आल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येते आहे.
दारुल उलूम देवबंद संस्थेचे प्रमुख मुफ्ती अब्दुल कासिम नूमानी यांनी दूरध्वनीवरून ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेला सांगितले की, छायाचित्रे काढणे हे इस्लाम धर्माच्याविरोधी आहे. पारपत्र किंवा ओळखपत्राशिवाय अन्य कोणत्याही कारणांसाठी मुस्लिमांनी स्वतःचे छायाचित्र काढू नये. निकाहाच्यावेळी छायाचित्रण करण्याला इस्लाममध्ये परवानगी नाही. त्याचबरोबर पुढच्या पिढीसाठी स्वतःची छायाचित्र जपून ठेवणेही इस्लाममध्ये मान्य नाही.
सौदी अरेबियामध्ये छायाचित्रणाला परवानगी असल्याकडे लक्ष वेधल्यावर ते म्हणाले, त्यांना जे करायचे आहे ते करू दे. आम्ही याला परवानगी देणार नाही. तिथल्या सगळ्याच गोष्टी बरोबर असतात असे नाही.
अभिय़ांत्रिकेचे शिक्षण घेतलेल्या एका तरुणाने आपल्याला छायाचित्रणात करिअर करण्याची इच्छा असल्याचे दारुल इफ्ता यांना विचारले होते. त्याला उत्तर देताना त्यांनी छायाचित्रण हे इस्लामविरोधी असल्याने त्यामध्ये करिअर करू नये, असे त्यांनी त्याला सांगितले.

Story img Loader