पीटीआय, नवी दिल्ली

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी गुरुवारी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. आंध्र प्रदेश राज्यांशी संबंधित विकासाच्या मुद्द्यांवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.

पंतप्रधान कार्यालयात (पीएमओ) झालेल्या बैठकीमध्ये नायडू यांनी आंध्र प्रदेशला विशेष श्रेणीचा दर्जा देण्याची मागणी केल्याचे समजते. भाजपच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकारमधील महत्त्वाचा सहयोगी असलेल्या तेलुगू देसम पक्षाच्या (टीडीपी) प्रमुखाने राज्याच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण प्रस्ताव मांडले आणि केंद्र सरकारची मदत मागितली, असे सूत्रांनी सांगितले.‘‘आंध्र प्रदेशच्या कल्याण व विकासाशी संबंधित महत्त्वाच्या बाबींवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दिल्लीत बैठक झाली. मला विश्वास आहे की त्यांच्या नेतृत्वाखाली आंध्र प्रदेश राज्य पुन्हा विकसित व बलाढ्य राज्य म्हणून उदयास येईल,’’ असे नायडू यांनी बैठकीनंतर सांगितले.