दक्षिण मुंबईचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी दोन दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली होती. त्यापाठोपाठ आता आंध्र प्रदेश काँग्रेसमध्ये मोठी उलथापालथ सुरू झाली आहे. आंध्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गिडुगू रुद्र राजू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजू हे प्रदेशाध्यक्षपदावरून पायउतार झाल्याने वाय. एस. शर्मिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी विराजमान होऊ शकतात. वाय. एस. शर्मिला या आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांच्या थोरल्या भगिनी आहेत. त्यांनी ४ जानेवारी रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
वाय. एस. शर्मिला यांनी १० दिवसांपूर्वी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे (केरळ) खासदार राहुल गांधी, काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला होता. याआधी त्यांनी तेलंगणाच्या विधानसभा निवडणुकीत स्वत:च्या पक्षाचे उमेदवार उभे न करता काँग्रेसला पाठिंबा दिला होता. त्यानंतर त्यांनी थेट काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेस हायकमांड आता शर्मिला यांच्याकडे आंध्र प्रदेश काँग्रेसची जबाबदारी सोपवू शकतं. शर्मिला या आंध्र प्रदेशचे दिवंगत नेते तथा माजी मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांच्या कन्या आहेत.
शर्मिला यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यापासूनच त्यांना पक्षाचं प्रदेशाध्यक्षपद दिलं जाईल, असं बोललं जात होतं. दरम्यान, विद्यमान अध्यक्ष गिडुगू रुद्र राजू यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडलं आहे. काँग्रेस पक्षप्रवेशाच्या वेळी शर्मिला म्हणाल्या होत्या की, पक्ष त्यांना जी जबाबदारी देईल ती पेलण्यास त्या समर्थ आहेत. शर्मिला म्हणाल्या होत्या, मी पक्षात कोणतीही जबाबदारी स्वीकारण्यास तयार आहे. केवळ आंध्र प्रदेशच नव्हे तर आंदमानमध्येही मी पक्षाची जबाबदारी घेण्यास तयार आहे.
हे ही वाचा >> बसपा INDIA आघाडीत सहभागी होणार? अखिलेश यादवांना ‘सरडा’ म्हणत मायावतींनी सांगितली पुढची योजना
वाय. एस. शर्मिला यांनी २०१९ च्या आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत वायएसआर काँग्रेसचा जोरदार प्रचार केला होता. त्या निवडणुकीत पक्षाने विजय मिळवला आणि जगनमोहन रेड्डी हे मुख्यमंत्री झाले. परंतु, गेल्या काही वर्षांमध्ये पक्षाने हळूहळू शर्मिला यांना बाजूला केलं. त्यामुळे शर्मिला यांनी पक्षाला रामराम करत काँग्रेसची वाट धरली.