आंध्रप्रदेश सरकारने हैदराबादमधून विजयवाडय़ाजवळच्या अमरावती येथे प्रशासकीय यंत्रणा हलवण्याचे संकेत दिले आहेत.
तेलंगणा विभक्त झाल्यानंतर कायमची राजधानी म्हणून विजयवाडा भागातील अमरावतीला राजधानीचे स्वरूप देण्याचे मनसुबे आखण्यात आले. द्विभाजन कायद्यानुसार हैदराबाद जरी येत्या २०२३ पर्यंत तेलंगणा आणि आंध्रप्रदेशची सामाईक राजधानी राहणार असले तरी पुढील वर्षी राज्य शासनाचा कारभार अमरावतीतून सुरू करण्याचे प्रयत्न दिसून येत आहेत. राज्य शासनाचे सचिवालयाचे काम हैदराबादमधून सुरू राहील, परंतु मुख्यमंत्री एन.चंद्राबाबू नायडू स्वत: अमरावतीची पाहणी करीत असून या प्रक्रियेला येत्या काही महिन्यांमध्ये वेग येईल.
लोकांच्या सोयीसाठी राज्याचे प्रशासन कायम राजधानीच्या ठिकाणी असावे, असे मुख्यमंत्र्यांना वाटते. द्विभाजन अस्तित्वात आल्यापासून मुख्यमंत्री २ जून २०१४ पासून हैदराबादला आहेत, परंतु ते गेल्या चार महिन्यांपासून विजयवाडय़ाला स्थायिक होण्याच्या प्रयत्नात होते.
नायडू क्वचित हैदराबादला येतात. आठवडय़ाच्या शेवटी ते येत नाहीत. त्यांनी हैदरामधून विजयवाडय़ाला विभाग हलवण्याची चालना दिल्याची माहिती आंध्रप्रदेश सरकारचे संवाद सल्लागार परकला प्रभाकर यांनी पीटीआयला दिली. शासनाचे सिंचन, महापालिका प्रशासन, माहिती आणि जनसंपर्क विभाग विजयवाडय़ाला हलवण्यात येणार आहेत. याविषयी कर्मचाऱ्यांना जून २०१६ मध्ये माहिती देण्यात येणार आहे. शासन संबंधित कर्मचाऱ्यांशी कार्यालय आणि निवास व्यवस्थेविषयी लवकरच संवाद साधेल. शासनाच्यावतीने अधिकाऱ्यांची एक समिती सप्टेंबरमध्ये स्थापन करण्यात आली असून तिच्यानुसार १२ हजार कर्मचाऱ्यांना प्रशासकीय कारणास्तव कायम राजधानीच्या ठिकाणी हलवण्यात येणार असल्याचे प्रभाकर म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा