Reduces Work Hours During Ramadan 2025 : सर्व सरकारी मुस्लिम कर्मचाऱ्यांना रमजान महिन्यात नमाज अदा करण्यासाठी कार्यालयातून लवकर निघण्याची परवानगी देण्यात आली आहे. तेलंगणा सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर आता आंध्र प्रदेश सरकारनेही हा निर्णय घेतला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आंध्र प्रदेश सरकारने म्हटले आहे की इस्लाम धर्म मानणारे सर्व कर्मचारी, शिक्षक आणि कंत्राटी, आउटसोर्सिंग आधारावर नियुक्त केलेल्या व्यक्तींना ही परवानगी असेल. आंध्र प्रदेश सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार मुस्लिम कर्मचाऱ्यांना २ मार्च ते ३० मार्च या कालावधीत ‘रमजान’ या पवित्र महिन्यात सर्व कामकाजाच्या दिवशी आवश्यक धार्मिक विधी करण्यासाठी त्यांचे कार्यालये किंवा शाळा बंद होण्याच्या वेळेच्या एक तास आधी निघण्यास सांगितले आहे.

भारतात रमजान महिना शुक्रवार (२८ फेब्रुवारी) पासून सुरू होण्याची अपेक्षा आहे आणि २८ फेब्रुवारी रोजी शाबानचा चंद्र दिसल्यास पहिला उपवास शनिवारी सुरू होईल. आंध्र प्रदेशपूर्वी तेलंगणा सरकारने राज्यात काम करणाऱ्या सर्व सरकारी मुस्लिम कर्मचारी, शिक्षक, कंत्राटी, आउटसोर्सिंग, बोर्ड, कॉर्पोरेशन आणि सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना “रमजान” च्या पवित्र महिन्यात, म्हणजेच २ मार्च ते ३१ मार्च (दोन्ही दिवस समाविष्ट) दुपारी ४.०० वाजता त्यांची कार्यालये/शाळा सोडण्याची परवानगी देणारा सरकारी आदेश जारी केला होता. वरील कालावधीत सेवांच्या अत्यावश्यकतेमुळे त्यांची उपस्थिती आवश्यक असल्यास ही सूट रद्द करण्यात येईल.

हा आदेश सरकारच्या मुख्य सचिव शांती कुमारी यांनी जारी केला आहे. १५ फेब्रुवारी रोजी लिहिलेल्या पत्रात शांती कुमारी म्हणाल्या की, “सरकार राज्यात काम करणाऱ्या सर्व सरकारी मुस्लिम कर्मचारी/ शिक्षक/ कंत्राटदार/ आउटसोर्सिंग/ बोर्ड/ कॉर्पोरेशन आणि सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना २ मार्च ते ३१ मार्च (दोन्ही दिवस समाविष्ट) पवित्र रमजान महिन्यात दुपारी ४.०० वाजता आवश्यक नमाज अदा करण्यासाठी त्यांची कार्यालये/ शाळा सोडण्याची परवानगी देते.

भाजपाच्या नेत्यांनी केली टीका

तेलंगणा सरकारच्या या निर्णयावर भाजपाच्या नेत्यांनी जोरदार टीका केली. या निर्णयाच्या विरोधात भाजपा नेते अमित मालवीय यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट करत म्हटलं आहे की, काँग्रेसने रमजान दरम्यान मुस्लिम राज्य कर्मचाऱ्यांसाठी कामाच्या तास कमी केले. पण जेव्हा नवरात्रीमध्ये हिंदू उपवास करतात तेव्हा अशा प्रकारची सवलत मिळत नाही. मात्र, काँग्रेस केवळ मतांचं राजकारण करतंय. याला विरोध झाला पाहिजे”, असं त्यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Andhra pradesh government reduces work hours of muslim workers during ramdan 2025 sgk