देशात अनेक राजकीय नेत्यांनी निवडणुकीपूर्वी दिलेल्यी आश्वासनांची पूर्तता न केल्याचं आपण पाहिलं आहे. पण, आता आंध्र प्रदेशात एका नगरसेवकाने मतदारांना दिलेली आश्वासन पूर्ण केले नाहीत. त्यामुळे स्वत:लाच चपलेनं मारून घेतलं आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
मुलापार्थी रामराजू, असं या नगरसेवकाचं नाव आहे. ते अनकापल्ली जिल्ह्यातील नरसिपट्टणम नगरपालिकेचे ( प्रभाग क्र. २० ) सदस्य आहेत. मुलापार्थी रामराजू हे रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करतात. नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रभागाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप मुलापार्थी रामराजू यांनी केला आहे. त्यामुळे नगरपालिकेच्या बैठकीतच रामराजू यांनी स्वत:ला चपलेनं मारून घेतलं.
याबद्दल ‘पीटीआय’शी बोलताना रामराजू यांनी सांगितलं की, “३१ महिन्यांपूर्वी मी नगरसेवक म्हणून निवडून आलो आहे. पण, माझ्या प्रभागातील ड्रेनेज, वीज, स्वच्छता, रस्ते आणि अन्य समस्यांचे निराकरण मी करू शकलो नाही.”
पालिका अधिकाऱ्यांनी प्रभाग क्र. २० कडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. प्रभागातील एकालाही नवीन पाण्याचे कनेक्शन मिळालं नाही. नागरिक प्रभागातील अपूर्ण कामांसाठी सतत तगादा लावत आहेत. पण, त्यांच्या आश्वासनांची पूर्तता करू शकलो नाही. त्यामुळे नगरपालिकेच्या बैठकीतच मेलेलं चांगलं आहे,” अशी प्रतिक्रिया मुलापार्थी रामराजू यांनी दिली आहे.