आयुष्यात येणाऱ्या आनंदाच्या क्षणामुळे जर एखादे रेकॉर्ड प्रस्थापित झाले तर तो आनंद द्विगुणित होतो. आंध्र प्रदेशातील जोडप्याच्या घरात दुसऱ्यांदा पाळणा हालला आणि त्यामुळे प्रस्थपित झालेल्या रेकॉर्डने त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. बाळाच्या जन्माने घरातील वातावरण आनंदात होते. या नवीन पाहुण्याच्या आगमनात असं काय खास होतं?
वर्षभराच्या अंतराने एकाच दिवशी बाळांचा जन्म झाल्याने आंध्र प्रदेशातील एका जोडप्याची ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली आहे. मेहबूब नसिर आणि रुबिना सुल्तान असे या दाम्पत्याचे नाव आहे. कुर्नूल येथे राहणाऱ्या मेहबूब आणि रुबिनाला लिम्का बुक ऑफ रेकॉर्डचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. त्यांचे पहिले मुलं २०१५ मध्ये ८ एप्रिल रोजी जन्माला आले होते. कालांतराने रुबिनाला पुन्हा दिवस गेले. घरातील वातावरण अतिशय आनंदित होते. दुसऱ्या बाळाचा जन्म बरोबर एक वर्षाच्या अंतराने म्हणजेच २०१६ च्या एप्रिल महिन्याच्या ८ तारखेलाच झाल्याने त्यांचा हा आनंद द्विगुणित झाला. दोन्ही बाळांचा जन्मबरोबर एक वर्षाच्या अंतराने एकाच तारखेला झाल्याने या विक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली. आपल्याला पहिली मुलगी असून, तिचे नाव आयेशा नौशिन असे आहे, तर आयेशाच्या जन्माच्या बरोबर एका वर्षानंतर जन्माला आलेल्या मुलाचे नाव मेहबूब शबिर असल्याचे वृत्तसंस्थेशी संवाद साधताना रुबिना म्हणाली. मेहबूब नसिर एका कंपनीत मेडिकल ट्रान्सक्रिप्टचे काम करतो. तर रुबिना नॅशनल काऊन्सिल फॉर प्रमोशन ऑफ उर्दू लँग्वेज अंर्तगत स्त्रिया आणि मुलांना उर्दू शिकविणाऱ्या संस्थेची मुख्य आहे.