म्यानमारच्या राजधानीतील विशेष न्यायालयाने पदच्युत नेत्या आंग सान सू ची यांना लोकांना भडकावल्याप्रकरणी तसेच करोना प्रतिबंधक नियमांचा भंग केल्याच्या प्रकरणात सोमवारी दोषी ठरवून चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे, अशी माहिती विधि विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
म्यानमारमध्ये लष्कराने १ फेब्रुवारीला सत्ता ताब्यात घेतल्यानंतर ७६ वर्षीय सू ची यांच्यावर खटले दाखल केले आहेत. त्यापैकी हा एक खटला होता. सू ची यांच्यावरील अन्य काही खटल्यांचा निकाल पुढील आठवड्यात सुनावला जाण्याची शक्यता आहे. जर या सर्वच प्रकरणांत सू ची दोषी ठरविल्या गेल्या तर, त्यांना एकत्रितपणे शंभर वर्षांहून अधिक कारावासाची शिक्षा सुनावली जाऊ शकते.
सू ची यांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आल्याचे वृत्त समजताच निषेधाचा सूर उमटू लागला आहे. संयुक्त राष्ट्रांचे मानवी हक्कविषयक माजी विशेष दूत यांगही ली यांनी न्यायालयातील हा खटलाच बनावट असल्याची टीका केली. सध्या न्यायालयेसुद्धा लष्कराच्या अंकित असल्याने निर्णय नि:पक्षपातीपणे होणार नाहीत, असे ते म्हणाले.
अन्य मानवी हक्क कार्यकर्त्यांनी याबाबत अॅम्नेस्टी इंटरनॅशनलकडे तक्रार केली आहे.