नीरज राऊत
करोना आजाराच्या विरुद्धच्या लढ्यात सहभागी होणाऱ्या डॉक्टर, नर्सेस व आशा वर्कर यांना ५० लाखांचे विमा संरक्षण केंद्र सरकारने घोषित केले आहे. परंतु त्यांच्या बरोबरीने या लढ्यात उतरलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना या विमा कवचापासून वंचित ठेवल्याने त्यांच्यामध्ये नाराजी पसरली आहे. विमाच्या लाभ अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना मिळावा अशी मागणी पुढे येत आहे.
संपूर्ण देशात करोना आजाराने थैमान घातले असे असताना त्याच्याविरुद्ध लढा देण्यास आरोग्य पथक अग्रक्रमाने पुढाकार घेत आहे. त्यांच्या बरोबरीने आशा व अंगणवाडी सेविका जनजागृतीचे तसेच गावागावात जाऊन सर्वेक्षण करण्याचे काम करीत असून केंद्रशासनाने विमा कवच देताना अंगणवाडी सेविकांना वगळल्याने त्या वर्गामध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे.
करोना चा संसर्ग टाळण्यासाठी सध्या अंगणवाडीमध्ये गरम ताजा आहार दिला जात नसला तरी अंगणवाडी सेविका व त्यांच्या मदतनीस यांच्यामार्फत करोना विषयी गावामध्ये जाऊन जनजागृती करण्याचे काम सोपवण्यात आले आहे. या अंगणवाडी सेविका गावांमध्ये बाहेर ठिकाणाहून आलेल्या नागरिकांची माहितीचे संकलन सर्वेक्षणांद्वारे करत असून त्याचा अहवाल महसूल विभागाला देत असतात. त्यामुळे स्थलांतरित झालेल्या नागरिकांना करोनाचा प्रसार होण्याबाबत एका प्रकारे रोख लागत असते. त्याचबरोबरीने अंगणवाडी सेविकांकडून अति कुपोषित बालकांकडे (सॅम) लक्ष ठेवण्यात येत असून अशा बालकांमध्ये आरोग्याच्या समस्या होऊ नये याकडे सेविकांच्या मार्फत लक्ष ठेवले जात आहे.
करोनाच्या लढ्यात आशा वर्कर यांच्या सोबतीने काम करणाऱ्या अंगणवाडीसेविकांना मात्र ५० लाख रुपयांच्या विमा कवचा मध्ये समाविष्ट करण्यात आले नाही. पालघर जिल्ह्यात सुमारे ३२०० अंगणवाडी सेविका व तितक्याच प्रमाणात मदतीस कार्यरत असून त्या सर्वांना या विम्याचे संरक्षण मिळावे अशी मागणी करण्यात येत आहे.
अंगणवाडी सेविका यादेखील तत्परतेने व निर्भयतेने करोना विषयी जनजागृती करणे, गावांमध्ये सर्वेक्षण करणे इत्यादी काम करत आहेत. त्यांनादेखील विमा संरक्षण मिळण्याबाबत सरकारने गांभीर्याने विचार करावा. यासाठी आम्ही पाठपुरावा करीत आहोत.
– श्वेता देसले, उपाध्यक्ष, महाराष्ट्र शिव अंगणवाडी सेना