महाराष्ट्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाणांनी पक्षाला राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये एवढी मोठी उलथापालथ झालेली असताना मध्य प्रदेशातूनही महत्त्वाची बातमी येत आहे. काँग्रेसचे नेते कमलनाथ हेही भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. परंतु, या चर्चा निराधार असल्याची प्रतिक्रिया पक्षाचे सरचिटणीस जितेंद्र सिंह यांनी दिली. ते एनडीटीव्हीशी बोलत होते.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे कलमनाथ यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून काढून टाकण्यात आले होते. यावरून नाराज होत कलमनाथ यांनी भाजपाचा मार्ग निवडला असल्याची चर्चा होती. परंतु, ही चर्चा म्हणजे माध्यमांचा गैरवापर आहे, अशी प्रतिक्रिया जितेंद्र सिंग यांचे उत्तराधिकीर जितू पटवारी यांनी स्पष्ट केलं.

“हे कमलनाथ यांच्या विरोधात षडयंत्र आहे. मी त्यांच्याशी बोललो आहे, ते म्हणाले की या सर्व गोष्टी केवळ अफवा आहेत आणि ते फक्त काँग्रेसचे असून काँग्रेसचेच राहणार आहेत. शेवटच्या श्वासापर्यंत ते काँग्रेसची विचारधारा कायम ठेवतील. हे त्यांचे स्वतःचे विचार आहेत”, असे जितेंद्र सिंह म्हणाले.

हेही वाचा >> कमलनाथ भाजपाच्या वाटेवर, पण १९८४ च्या दंगलीमुळे अडचण; वाचा ४० वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं?

कमलनाथ यांनी काय स्पष्टीकरण दिले?

माध्यम प्रतिनिधींनी कमलनाथ यांना तुम्ही भाजपात प्रवेश करणार का? असा प्रश्न विचारला. याचे उत्तर देताना कमलनाथ म्हणाले की, पक्षबदलाचा माझा काही विचार असेल तर त्याची माहिती मी सर्वप्रथम माध्यमांना देईन. कमलनाथ यांनी भाजपा प्रवेशाची शक्यता थेट नाकारली नाही. याबाबत विचारले असता “शक्यता नाकारण्याचा प्रश्नच नाही. माध्यमांचे प्रतिनिधी उत्साहित होत आहेत. मी मात्र उत्साहित झालेलो नाही. मात्र माझा पक्षबदलाचा काही विचार असेल तर मी तशी माहिती देईल,” असे कमलनाथ यांनी स्पष्ट केले.

प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी

दरम्यान, विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर कमलनाथ यांची उचलबांगडी करण्यात आली. त्यांना मध्य प्रदेशच्या प्रदेशाध्यक्षपदावरून दूर करण्यात आले. या निवडणुकीत भाजपाने २३० जागांपैकी एकूण १६३ जागांवर विजय मिळवला होता. तर काँग्रेसला अवघ्या ६६ जागांवर विजयी होता आले.

कलमनाथ यांची राजकीय कारकिर्द

कमलनाथ यांनी १९७० च्या दशकात युवक काँग्रेसमधून आपल्या राजकीय कारकिर्दीला केली. ते मूळचे उत्तर प्रदेशाच्या कानपूर येथील रहिवासी आहेत. १९८० मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मध्य प्रदेशातील छिंदवाडा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. आणीबाणीनंतरच्या काळात झालेल्या या निवडणुकीत काँग्रेसने छिंदवाडा आणि राजस्थानमधील नागौर या दोनच जागांवर विजय मिळविला होता. त्यानंतर कमलनाथ हे छिंदवाड्यातून नऊ वेळा खासदार राहिले. तसेच कमलनाथ हे पी. व्ही. नरसिंह राव आणि मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये मंत्रीही होते. २०१८ मध्ये मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यानंतर ते मध्य प्रदेशचे मुख्यमंत्रीही झाले.

Story img Loader