संगणक आणि मोबाइलवरील आबालवृद्धांना मोहात पाडणारा जगातील सर्वात पसंतीचा गेम ‘अँग्री बर्ड्स’ लवकरच मोठय़ा पडद्यावर अवतरणार आहे. अवघ्या तीन वर्षांत प्रसिद्धी आणि पसंतीची शिखरे पादाक्रांत करणारी अँग्री बर्ड्समधील पात्रे एका थ्रीडी सिनेमाद्वारे चित्रपटगृहांत धम्माल उडवणार असून हा गेम बनवणाऱ्या कंपनीनेच यासाठी पुढाकार घेतला आहे.
‘पक्ष्यांची अंडी खाण्यासाठी व त्यांना त्रास देण्यासाठी येणाऱ्या डुकरांचा नायनाट करणारे वेगवेगळी शक्ती असलेले पक्षी’ या कथासूत्रावर आधारित हा गेम २००९मध्ये संगणकावर सुरू करण्यात आला. त्याला मिळालेल्या पसंतीच्या आधारे मोबाइल, लॅपटॉप, टॅब्लेट इतकेच नव्हे तर ऑनलाइन माध्यमातून हा गेम जगभर पोहोचला. गेल्या तीन वर्षांत तब्बल एक अब्जपेक्षाही जास्त जणांनी हा गेम डाऊनलोड केला असून लहान मुलांत त्याची भलतीच क्रेझ आहे. अलीकडेच या श्रेणीतील ‘अँग्री बर्ड्स स्टार वॉर्स’ हा गेम प्रकाशित होताच अवघ्या अडीच तासांत अमेरिकेतील आयफोन यूझर्ससाठीचा सर्वात पसंतीचा गेम ठरला होता.
अँग्री बर्ड्सची हीच क्रेझ आता चित्रपटाच्या रूपाने आणखी वाढवण्याचा विचार सुरू झाला आहे. रोव्हिओ एंटरटेनमेंट या कंपनीने त्यासाठी ‘डिस्पिसेबल मी’ या चित्रपटाचे निर्माते जॉन कोहेन यांच्याशी बोलणी चालवली आहेत. हा थ्रीडी चित्रपट २०१६च्या उन्हाळय़ात प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.     

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Angry birds play on big screen