Woman Passenger Bites Flight Attendant: सोशल मीडियावर आपल्याला विमान प्रवासा दरम्यान प्रवाशांमध्ये होणाऱ्या वादाचे व्हिडिओ सतत पाहायला मिळत असतात. आता विमान प्रवासातील असात एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये दोन प्रवाशांमधील भांडण सोडवताना एका प्रवाशाने फ्लाइट अटेंडंटला चावा घेतल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान या घटनेमुळे चीनमधील शेन्झेनहून शांघायला जाणारे विमानाच्या उड्डाणाला तब्बल तोन तास उशीर झाला.
१ एप्रिल रोजी घडली होती घटना
शेन्झेन एअरलाइन्सच्या म्हणण्यानुसार, ही घटना १ एप्रिल रोजी विमान उड्डाणाच्या तयारीत होते तेव्हा घडली आहे. विमानात शेजारी बसलेल्या दोन महिला प्रवाशांमध्ये वाद झाला होता. यातील एका महिला प्रवाशाने शेजारी बसलेल्या महिलेच्या शरीराचा दुर्गंध येत असल्याची तक्रार केली, तर दुसरीने तिच्या सहप्रवाशाच्या परफ्यूमच्या वासावर आक्षेप घेतला होता. त्यांच्यातील शाब्दिक वादाचे रूपांतर बाचाबाचीत आणि नंतर हाणामारीत झाले.
चार केबिन क्रू सदस्यांची मध्यस्थी
या महिल प्रवाशांमधील हाणामारी पाहूण परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी दोन महिला फ्लाइट अटेंडंट आणि दोन पुरुष सहकारी असे चार केबिन क्रू सदस्य पुढे आले. यावेळी त्यांना दोन्ही महिला प्रवाशांना शांत करण्याचा प्रयत्न केला असता, एक महिलेने एका फ्लाइट अटेंडंटचा चावा घेतला.
तोंड उघडा, तुम्ही मला चावले आहे
दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, व्हिडिओमध्ये ज्या फ्लाइट अटेंडंटचा चावा घेतला ती ओरडताना दिसत आहे. यामध्ये फ्लाइट अटेंडंट चावा घेणाऱ्या महिला प्रवाशाला, “तोंड उघडा, तुम्ही मला चावले आहे”, असे म्हणताना ऐकू येत आहे. दरम्यान एअरलाइनने या घटनेला दुजोरा दिला असून, फ्लाइट अटेंडंटच्या हाताला किरकोळ दुखापत झाली असल्याचे सांगितले आहे. या घटनेनंतर जखमी फ्लाइट अटेंडंटला ताबडतोब रुग्णालयात करण्यात आले आहे. जिथे तिची प्रकृती स्थिर आहे.
दोन्ही महिला पोलिसांच्या ताब्यात
या घटनेनंतर, सर्व प्रवाशांना विमानातून खाली उतरण्यास सांगण्यात आले होते. त्यानंतर दोन तासांनी त्यांना विमानात बसवले आणि मग विमानाने उड्डाण केले. दरम्यान विमानात वाद घालणाऱ्या दोन्ही महिला प्रवाशांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
प्रवाशांच्या वर्तनावर टीका
दरम्यान या घटनेचे वृत्त आणि व्हिडिओ समोर येताच चीनसह जगभरातील सोशल मीडिया युजर्स भांडण करणाऱ्या महिला प्रवाशांच्या वर्तनावर टीका करत आहेत.