शिवसेना पक्ष धनुष्यबाण चिन्ह आणि नाव यावर आज ( १७ जानेवारी ) निवडणूक आयोगासमोर सुनावणी पार पडली. आता पुढील सुनावणी शुक्रवारी ( २० जानेवारी ) होणार आहे. या सुनावणीनंतर शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार अनिल देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या सुनावणीवेळी समोरील पक्षाने मांडलेल्या गोष्टी चुकीच्या होत्या. त्यांनी केलेला दावा आणि दोन गटात संघटना विभागली गेली, याचा पाया काय? हे पुरावे देत कपिल सिब्बल यांनी मांडणी केली, अशी माहिती अनिल देसाई यांनी दिली.
दिल्लीत प्रसारमाध्यमांनी बोलत अनिल देसाई म्हणाले, “संघटनात्मक निवडणुकीबद्दल कोणतीही सुनावणी झाली नसून, शुक्रवारी त्यावर निर्णय होईल. शिवसेनेची घटना घेऊन ते मुख्यनेते होतात. घटनेत तोडफोड करून तथागथित बैठक घेण्यात आली. म्हणजे एकाबाजूला शिवसेनेची घटना मान्य करायची. दुसरीकडे तुमच्या ती घटनाच नाही, असं वकीलांनी प्रतिपादन करायचं. हा विरोधभास आहे,” अशी टीका अनिल देसाई यांनी केली.
हेही वाचा : धनुष्यबाण निवडणूक चिन्हावर बोलताना विनायक राऊतांचे महत्त्वाचे विधान; म्हणाले “एकनाथ शिंदेंचा बोलविता धनी..”
शुक्रवारी अतिरिक्त वेळ का मागण्यात आली, असं विचारलं असता देसाई यांनी सांगितलं, “सुनावणीचा प्रत्येक मुद्दा मांडणं गरजेचं आहे. कारण, हा निकाल देशाच्या लोकशाहीतील अत्यंत महत्वाचा आणि ऐतिहासिक असा निर्णय होणार आहे. तसेच, त्यांच्या कागदपत्रांमधील त्रुटी बाहेर येत आहेत,” असेही अनिल देसाईंनी म्हटलं.
हेही वाचा : एकनाथ शिंदेंकडे बहुमत असल्याने लवकर निर्णय घ्या, शिंदे गटाचा निवडणूक आयोगासमोर दावा
“आमदार-खासदार निघून गेले असतील मात्र…”
दरम्यान, यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही भाष्य केलं आहे. “शिंदे गटाचे आमदार धनुष्यबाणावरच निवडून आले आहेत. त्यांच्या एबी फॉर्मवर पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची सही आहे. ज्यांना आम्ही धनुष्यबाण चिन्ह दिलं, त्यातले काही लोकं फुटून बाहेर पडले, याचा अर्थ पक्षात फूट पडली, असे म्हणता येणार नाही. काही आमदार-खासदार निघून गेले असतील, मात्र, पक्ष जागेवर आहे. पक्षातील फुटीचा जो देखावा निर्माण केला जातो, तो आभासी आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात जोपर्यंत निर्णय लागत नाही, तोपर्यंत निवडणूक आयोगाने निर्णय देण्याची घाई करू नये,” असं संजय राऊतांनी सांगितलं.