Agra Jama Masjid Protest 60 People Booked : उत्तर प्रदेशमधील जामा मशि‍दीच्या आत प्राण्यांच्या मांसाचे पाकिट आढळल्याचा प्रकार उजेडात आला होता. यानंतर मशि‍दीच्या बाहेर जोरदार निदर्शने करण्यात आली होती. यानंतर आता या आंदोलन प्रकरणी पोलिसांनी ६० जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. मशिदीतील शुक्रवारची प्रार्थना संपल्यानंतर ही निदर्शने करण्यात आली होती, यावेळी जमावाने मशिदीत मांस ठेवणाऱ्या व्यक्तीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली. यादरम्यान परिस्थिती तणावपूर्ण बनल्यानंतर जमावाला पांगवण्यासाठी सौम्य बळाचा वापर करावा लागल्याचे पोलिसांनी सांगितले.

दमरम्यान मशि‍दीत मांसाचा तुकडा ठेवणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबरोबरच जामा मशिदीबाहेर गोंधळ घालणाऱ्यांविरोधात देखील गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आंदोलनात सहभागी असलेल्या जवळपास ६० लोकांची नावे एफआयआरमध्ये देण्यात आली आहेत, अशी माहिती पोलिस उपायुक्त सोनम कुमार यांनी दिल्याचे पीटीआयने म्हटले आहे.

आग्र्याच्या मंटोला परिसरातील जामा मशिदीत गुरुवारी रात्री उशिरा नझरुद्दीन नावाच्या एका व्यक्तीने प्राण्याच्या मांसाचे पॅकेट ठेवल्याचा आरोप आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, ही घटना दुसर्‍या दिवशी सकाळी शुक्रवारच्या नमाजाच्या आधी उघडकीस आली. यामुळे स्थानिकांमध्ये एकच खळबळ उडाली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मशिदीतील सीसीटीव्ही फुटेजमध्ये नझरुद्दीन हा स्कूटीवर मशिदीत येताना दिसत आहे. तसेच तो मशिदीत प्रवेश करून पाकिट ठेवताना आणि निघून जाताना दिसून येत आहे. यानंतर परिसराच्या सुरक्षेसाठी आणि प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी १०० हून अधिक पोलिस अधिकारी येथे तैनात करण्यात आले आहेत. अधिकार्‍यांनी पॅकेट जप्त केले आणि त्यामध्ये नेमकं काय होतं याचा तपास करण्यासाठी ते फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले आहे.

चौकशीदरम्यान स्कूटी ही एका मांस विक्री करणाऱ्या दुकानाजवळ आढळून आली. दुकानाच्या मालकाशी चर्चा केल्यानंतर पोलीसांनी नझरुद्दीन याला अटक केली आहे. त्याला शुक्रवारी ताब्यात घेण्यात आले असून नझरुद्दीन एकट्यानेच हे कृत्य केली की यामध्ये इतर कोणी सहभागी होते या दृष्टीने तपास केला जाणार असल्याचे या प्रकरणाची चौकशी करत असलेल्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

एनएसए कायद्याअंतर्गत कारवाई होणार

या प्रकरणात राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत (एनएसए) कारवाई केली जाईल, अशी माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त संजीव त्यागी यांनी दिली आहेयय. ते पुढे म्हणाले, “आम्ही या कृतीमागील उद्देश आणि यामध्ये आणखी कोणी सहभागी आहे का याचा शोध घेत आहोत.”

शुक्रवारच्या प्रार्थनेनंतर मशिदीबाहेर जमाव गोळा झाला होता. त्यांच्याकडून पकडण्यात आलेल्या व्यक्तीला कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी केली जात होती. वातावरण तणावपूर्ण बनल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी मशिदीबाहेरील जमावर काही प्रमाणात बळाचा वापर करण्यात आला. तसेच जामा मशि‍दीच्या परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली.