उत्तराखंडमधील पौडी जिल्ह्यातील ‘वनतारा’ रिसॉर्टमध्ये काम करणाऱ्या १९ वर्षीय अंकिता भंडारी या तरुणीच्या खुनानंतर राज्यासह देशभरात संतापाची लाट उसळली आहे. उत्तराखंडमधील भाजपा नेते विनोद आर्या यांचे पुत्र पुलकित यांच्या मालकीच्या रिसॉर्टजवळील कालव्यात या तरुणीचा शनिवारी सकाळी मृतदेह आढळून आला आहे. मृत्यूच्या काही तासांपूर्वी अंकिताने तिच्या एका मित्राला फोन केल्याचे समोर आले आहे. रिसॉर्टमधील अतिथींसोबत लैंगिक संबंध ठेवण्यासाठी पुलकित आर्या आणि त्याचे साथीदार दबाव आणत असल्याचे अंकिताने तिच्या मित्राला सांगितले होते. “मी जरी गरीब असले, तरी स्वत:ला १० हजारांसाठी विकणार नाही” असे व्हॉट्सअॅप संदेशाद्वारे अंकिताने तिच्या मित्राला म्हटल्याचे उघडकीस आले आहे.
Ankita Bhandari Murder Case: फेसबूक फ्रेंडमुळे उलगडलं हत्येचं गूढ, धक्कादायक कारण आलं समोर
दरम्यान, शवविच्छेदन अहवालात तरुणीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या तरुणीच्या मृतदेहावर जखमा असल्याचेही समोर आले आहे. अंकिताच्या खून प्रकरणात पुलकित आर्या आणि त्यांच्या दोन साथीदारांना पोलिसांनी शुक्रवारी अटक केली असून आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
१८ सप्टेंबरला पुलकित आर्याच्या रिसॉर्टमधून अंकिता भंडारी बेपत्ता झाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकिता रात्री आठच्या सुमारास पुलकित, रिसॉर्टचा मॅनेजर सौरभ भास्कर आणि अंकित गुप्तासोबत हृषीकेशला गेली होती. या शहरातून परतत असताना आरोपी चिला रोड परिसरातील एका कालव्याजवळ दारू पिण्यासाठी थांबले होते. या दरम्यान, रिसॉर्टमध्ये गैरकृत्य करण्यासाठी दबाव आणत असल्याचा आरोप करत अंकिताचा आरोपींसोबत जोरदार वाद झाला. ही बाब सार्वजनिक करण्याची धमकी देताच रागाच्या भरात आरोपींनी अंकिताला कालव्यात ढकलून दिले.
दरम्यान, या घटनेच्या विरोधात हृषीकेशमधील स्थानिकांनी शनिवारी तीव्र विरोध प्रदर्शन केले. न्यायाची मागणी करत शेकडो लोकांनी पोलिसांच्या गाडीला घेराव घातला होता. संतप्त नागरिकांनी पुलकित आर्याचे रिसॉर्ट पेटवून दिले होते. त्याआधी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या आदेशानंतर रिसॉर्टच्या काही भागाचे पाडकाम करण्यात आले होते. या खून प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाकडून(SIT) करण्यात येत आहे.