लोकपाल विधेयकावरून केंद्र सरकारने जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोप ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी शुक्रवारी अलाहाबादमध्ये केला. सरकारच्या या कृतीविरोधात लवकरच आपण रामलीला मैदानावर आंदोलन छेडणार असल्याचेही हजारे यांनी यावेळी स्पष्ट केले.
सक्षम लोकपाल विधेयक आणण्याचा ठराव संसदेने मंजूर केल्यानंतर पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी आमच्या सूचनांचा नक्की विचार केला जाईल, असे लेखी आश्वासन दिले होते, असे अण्णा हजारे यांनी सांगितले. सक्षम लोकपालाची निर्मिती केली जाईल, असेही आश्वासन पंतप्रधानांनी दिले होते. मात्र, या आश्वासनाला दोन वर्षे उलटली, तरी अद्याप काहीही झालेले नाही, असा आरोप हजारे यांनी केला.
ते म्हणाले, केंद्र सरकारचा हा विश्वासघात आहे. त्यांनी देशातील जनतेला दिलेले आश्वासन पाळलेले नाही. आम्ही आता शांत बसणार नाही. लवकरच याविरोधात रामलीला मैदानावर नव्याने आंदोलन छेडण्यात येईल. आंदोलनाची तारीख जरी अजून ठरलेली नसली, तरी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्येच आम्ही ते करणार आहोत.