पीटीआय, चेन्नई
दिवंगत द्रविड नेते सी. एन. अण्णादुराई यांच्याबाबत झालेल्या टीकाटिप्पणीवरून संतप्त झालेल्या अखिल भारतीय अण्णा द्रमुकने सोमवारी भारतीय जनता पक्षाबरोबर असलेली युती संपुष्टात आल्याची घोषणा केली. दिवंगत मुख्यमंत्री अण्णादुराई यांच्याबरोबरच राज्याच्या अन्य नेत्यांविषयी अवमानकारक वक्तव्ये सहन केली जाणार नाहीत, असा इशाराही पक्षाने दिला आहे.
या वादात अण्णा द्रमुकने भाजपचे तमिळनाडू प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांना लक्ष्य केले आहे. स्वत:चे प्रस्थ वाढविण्यासाठी ते द्रविड जनांचे आदर्श असलेल्या अण्णादुराई, ईव्ही रामस्वामी पेरियार आणि अण्णा द्रमुकचे दिवंगत नेते एम. जी. रामचंद्रन तसेच जयललिता यांच्याबाबत आक्षेपार्ह विधाने करीत आहेत, असा आरोप अण्णा द्रमुकने केला आहे. त्यावर भाजपने म्हटले आहे की, अण्णा द्रमुकचे खरे दुखणे म्हणजे हा पक्ष वाढत नाही, तसेच अण्णामलाई यांच्यासारखे तरुण नेते पुढे येत आहेत.
हेही वाचा >>>“हात जोडून कळकळीची विनंती, मोदींची इच्छा पूर्ण करा”, सुप्रिया सुळेंकडून सिंचन घोटाळ्याच्या चौकशीची मागणी
काही दिवसांपूर्वी अण्णा द्रमुकचे सरचिटणीस ईडापल्ली के. पलानीस्वामी यांनी दिल्लीत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. पक्षाचे ज्येष्ठ नेते डी. जयाकुमार यांनी म्हटले आहे की, अण्णादुराई यांचा अवमान आम्ही सहन करणार नाही. जे. जयललिता यांच्यासह अण्णा द्रमुकच्या अन्य दिवंगत नेत्यांबाबत अण्णामलाई यांनी वादग्रस्त वक्तव्ये केल्यानंतर त्यांना आवर घालावा, अशी मागणी या पक्षाने भाजपकडे केली होती.
तमिळनाडूत लोकसभेच्या ३९ जागा, तर शेजारच्या पुडुचेरीत लोकसभेची एक जागा आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांना अण्णा द्रमुकबरोबर युती पाहिजे असली तरी अण्णामलाई यांना ती नको आहे. आम्ही आमच्या नेत्यांचा अवमान का सहन करावा? आम्ही त्यांच्यासोबत का राहावे. तमिळनाडूत भाजपचे अस्तित्व काय आहे? आमच्यामुळे तो पक्ष माहीत झाला. युतीचा विचार केला तर ती नाही आहे. भाजप हा अण्णा द्रमुकबरोबर नाही. निवडणुका आल्यावरच त्यावर चर्चा होऊ शकते, ही आमची भूमिका आहे. – डी. जयाकुमार, नेते, अण्णा द्रमुक