जंतरमंतर. बरोब्बर वर्षभरापूर्वी याच ठिकाणी समाजसेवक अण्णा हजारे व त्यांचे बिनीचे शिलेदार अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, कुमार विश्वास जनलोकपाल विधेयकाच्या मागणीसाठी उपोषणाला बसले होते. त्याच जंतरमंतरवर एका टोकावर आज केजरीवाल यांचे समर्थक आहेत; तर दुसऱ्या टोकावर अण्णा हजारे यांचे समर्थक आहेत. तर मधल्या मध्ये गांधी टोपी घातलेला ‘आम आदमी’ आहे.
जंतरमंतरला लागून असलेल्या टॉलस्टॉय मार्गावरच उपोषण, आंदोलने होतात. टॉलस्टॉय मार्गावर प्रवेश करताच अण्णा हजारे यांना समर्थन देण्यासाठी जनतंत्र मोर्चाचे कार्यकर्ते, नेते उपोषणाला बसले आहेत. व्यासपीठावर पाच व समोर पन्नास अशी अण्णा समर्थकांची स्थिती आहे. टॉलस्टॉय मार्गाच्या दुसऱ्या टोकावर आम आदमी पक्षाची सभा होती. दिल्लीत सर्वाधिक २८ जागा जिंकून विधानसभा निवडणुकीची समीकरणे बदलणाऱ्या अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पक्षाच्या समर्थकांना आज (बुधवारी) जंतरमंतरवर येण्याचे आवाहन केले होते. हजारोंच्या संख्येने दिल्लीकर तेथे दाखल झाले. प्रत्येकाच्या डोक्यावरील गांधी टोपीवर ‘आम आदमी पार्टी’ व ‘मुझे चाहिए स्वराज’ असे लिहिले. टोपीवर झाडूचे चिन्हही होते. याच गर्दीत दोन-चार जणांनी घातलेल्या गांधी टोपीवर ‘मैं हूँ अन्ना’ व ‘मुझे चाहिए जनलोकपाल’ असे लिहिले होते. अर्थातच ते अण्णा हजारे यांचे समर्थक होते. हजारोंच्या संख्येने समर्थक आम आदमी पार्टी, अरविंद केजरीवाल, भारतमातेच्या जयजयकाराच्या घोषणा देत होते. आम आदमी पार्टीचे व्यासपीठ कुमार विश्वास, केजरीवाल, प्रा. योगेंद्र यादव, कुमार विश्वास यांच्यासह विजयी उमेदवारांच्या उपस्थितीने ओसंडून वाहत होते. इकडे अण्णासमर्थक जनतंत्र मोर्चाच्या व्यासपीठावर निखिलेश मौर्या व दोन-चार कार्यकर्ते होते. अण्णा समर्थकांना तिथे येणारा ‘आम आदमी’ विचारत होता, अरविंद केजरीवाल की रॅली कहाँ है? वृत्तवाहिन्यांचा कॅमेरा आम आदमी पार्टीवरच होता. जंतरमंतरवर गर्दी खेचणाऱ्या ‘चेहऱ्यात’ बदल झाल्याची ही चाहूल होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा