टीम अण्णा फुटल्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाचे प्रणेते अण्णा हजारे यांनी त्यांचा नवीन संघ जाहीर केला असून अराजकीय मार्गाने भ्रष्टाचाराच्या विरोधात ते लढा देणार आहेत. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली एक गट टीम अण्णामधून बाहेर पडला असून ते राजकीय मार्गाने भ्रष्टाचाराविरोधात लढा देणार आहेत. अण्णांच्या नव्या संघात माजी लष्करप्रमुख व्ही.के.सिंग यांना खास निमंत्रित म्हणून स्थान मिळाले आहे.
पी.व्ही राजगोपाल, जलतज्ज्ञ राजिंदर सिंग व कृषी तज्ज्ञ देवेंदर शर्मा यांची नावे पहिल्या यादीत समाविष्ट नाहीत.
हजारे यांनी इंडिया अगेन्स्ट करप्शन चळवळीत नव्याने जोम आणण्यासाठी नवीन समन्वय समिती तयार केली आहे.
हजारे यांनी पंधरा सदस्यांची जी समन्वय समिती जाहीर केली आहे त्यात न्या. संतोष हेगडे, किरण बेदी, मेधा पाटकर, अखिल गोगोई, सुनीता गोडारा, अरविंद गौर, शिवेंद्रसिंग चौहान, राकेश रफिक यांचा समावेश आहे. पंजाबचे माजी पोलीस महासंचालक शशीकांत, माजी आयएएस अधिकारी अविनाश धर्माधिकारी, लेफ्टनंट कर्नल ब्रिजेंद्र खोखर, रणसिंग आर्य, कार्यकर्ते अक्षयकुमार व कृषी तज्ज्ञ विश्वंभर चौधरी या नवीन चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.
हजारे यांनी वार्ताहरांना सांगितले की, आपण व्ही.के.सिंग यांना बैठकीचे निमंत्रण पाठवले होते. ते आपल्याला नंतर भेटणार आहेत. हेगडे व धर्माधिकारी हे काही कारणास्तव बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत.
कृती कार्यक्रमाबाबत हजारे यांनी सांगितले की, समन्वय समितीचा विस्तार केला जाणार असून त्यात ४० प्रतिष्ठित नागरिकांचा समावेश केला जाईल. टीममध्ये फूट पडल्यानंतर आपण शांत झालो अशा शंका व्यक्त केल्या जात होत्या पण आम्ही भ्रष्टाचारविरोधी चळवळीत खंड पडू दिलेला नाही. आम्हाला सरकारचे निरुपयोगी लोकपाल नको आहे. आम्हाला मजबूत लोकपाल हवा, विकेंद्रीकरण हवे, संसद किंवा विधिमंडळ खासदार- आमदारांना घरी पाठवण्याचा अधिकार हवा, नागरी संहिता हवी. जर हे सगळे कायदे झाले तर ९० टक्के भ्रष्टाचार नष्ट होईल. या सरकारला ते करायचे नाही. त्यांनी लोकपाल आणले तर १५ मंत्री तुरुंगात जातील हे त्यांना माहीत आहे, त्यामुळे ते लोकपाल कशासाठी आणतील. शेवटी कोटय़वधी लोकांच्या दडपणाने त्यांना हा कायदा करावा लागेल. पुढील लोकसभा निवडणुकीपूर्वी सरकारला लोकपाल विधेयक आणावे लागेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा