दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळवून साऱ्यांनाच चकीत करणारे अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला चाप लावण्यासाठी आता काँग्रेस आणि भाजपने छुपे संधान साधले आहे. केंद्र सरकारने मांडलेल्या लोकपाल विधेयकाला सोमवारी राज्यसभेत पाठिंबा देण्याचा निर्णय भाजपने जाहीर केला, तर राळेगणसिद्धी येथे उपोषणास बसलेले अण्णा हजारे यांनीही सरकारच्या विधेयकावर ‘समाधान’ व्यक्त केले. त्यामुळे सरकारी लोकपालला विरोध करणारा आम आदमी पक्ष एकटा पडला असून, या मुद्दय़ावर अरविंद केजरीवाल कोंडीत सापडले आहेत.
काँग्रेस आणि भाजपने दिल्ली विधानसभेत ‘आप’ला सत्तास्थापनेसाठी स्वतंत्रपणे बिनशर्त समर्थन देण्याचे जाहीर केले आहे. मात्र, केजरीवाल यांनी या दोन्ही पक्षांच्या प्रमुखांना पत्र पाठवून पाठिंबा घेण्यासाठी त्यांच्यासमोर काही अटी ठेवल्या आहेत. या अटींमध्ये ‘अण्णा हजारे यांचे जनलोकपाल मंजूर करा’ अशीही अटआहे. मात्र, खुद्द अण्णांनीच सरकारच्या लोकपाल विधेयकाबाबत समाधान व्यक्त करून केजरीवाल यांची कोंडी केली.
तत्पूर्वी, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकपाल विधेयकासाठी सर्व पक्षांना पाठिंब्याचे आवाहन केले. सरकारच्या लोकपाल विधेयकाला केजरीवाल आणि अण्णा यांचा सुरुवातीपासूनच विरोध होता. मात्र, शनिवारी अण्णांनी आपली भूमिका बदलली. अण्णांच्या या कोलांटउडीवर केजरीवाल यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. यामुळे अण्णा व आप एकमेकांच्या विरोधात उभे असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. –
“सरकारी जोकपालवर अण्णा कसे काय सहमत झाले? त्यांची दिशाभूल कोणी केली? अंतिम श्वासापर्यंत आम्ही जनलोकपाल विधेयकासाठी लढू.”
अरविंद केजरीवाल
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा