एक श्रेणी-एक निवृत्तिवेतन या माजी सैनिकांच्या मागणीला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यानी पाठिंबा दिला असून, नरेंद्र मोदी सरकारने हे आश्वासन पूर्ण न केल्याचा आरोप केला आहे. माजी लष्करी जवानांना एक श्रेणी-एक निवृत्तिवेतन तत्त्वाप्रमाणे त्यांच्या वाटेची रक्कम मिळावी यासाठी आपण शक्य ते सर्व प्रयत्न करू, असे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे हजारे हे माजी सैनिक असून त्यांनी एक श्रेणी-एक निवृत्तिवेतन या तत्त्वाच्या अंमलबजावणीसाठी माजी सैनिकांनी आयोजित केलेल्या निषेध मेळाव्यात भाग घेतला.
हजारे यांनी सांगितले, की आपण देशभर दौरा करून या प्रश्नावर लोकांमध्ये जागृती निर्माण करू, तसेच या दौऱ्याचा शेवट २ ऑक्टोबरला रामलीला मैदानात होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता त्यांनी सांगितले, की त्यांनी एक श्रेणी-एक निवृत्तिवेतनाचे आश्वासन माजी सैनिकांना दिले होते, पण त्याबाबत अजून निर्णय घेतलेला नाही. आज ‘कारगिल दिन’ आहे, शहीद दिवस आहे, तो भाषणे करण्यासाठी नाही. तरी माजी सैनिकांच्या या मागणीवर आपण देशभर जनजागृती करणार आहोत, असे त्यांनी जंतरमंतर येथे आयोजित मेळाव्यात सांगितले.
ते म्हणाले की, ‘एक श्रेणी, एक वेतन’च्या मागणीसाठी माजी सैनिकांची मते ऐकून घेण्यासाठी आपण देशभर दौरा करणार आहोत.
पर्रिकर चांगले गृहस्थ, पण..
संरक्षणमंत्री मनोहर र्पीकर हे चांगले गृहस्थ आहेत, पण त्यांनीही आश्वासन पूर्ण केले नाही. फेब्रुवारीत त्यांनी अर्थमंत्रालयाकडून ५०० कोटी रुपये घेऊन प्रसंगी आणखी तरतूद करून माजी सैनिकांना दिलेले आश्वासन पूर्ण करू असे सांगितले होते, पण त्याची पूर्तता केली नाही. अजून दोन महिने आहेत. त्यानंतर मात्र आपण लोकांमध्ये जाऊन ही मागणी लावून धरणार आहोत. आंदोलन करण्याची वेळ आमच्यावर आणू नका, कारण काही वेळा त्यातून हिंसाचार झाला तर त्याचा फटका सामान्य लोकांना बसतो. सरकारने निवडणुकीच्या वेळी दिलेली सगळीच आश्वासने पूर्ण करावीत असेही त्यांनी सांगितले.