Anna Hazare letter to Arvind Kejriwal : मद्य धोरणात कथित घोटाळा झाल्याचे आरोप दिल्ली सरकारवर करण्यात आले आहेत. याप्रकरणी आम आदमी पार्टीच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. असं असताना आता ज्येष्ठ समाजसुधारक अण्णा हजारे यांनी एक पत्र लिहून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीकास्र सोडलं आहे. केजरीवाल यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात अण्णा हजारे म्हणाले की, तुम्ही ‘स्वराज’ पुस्तकात मोठमोठ्या गोष्टी लिहिल्या होत्या, पण त्याचा तुमच्या आचरणावर काहीही परिणाम झाल्याचं दिसत नाही. तुम्ही सध्या सत्तेच्या नशेत धुंद आहात, जनआंदोलनातून उदयास आलेल्या पक्षाला अशा प्रकारचं वागणं शोभत नाही, अशी टीका अण्णा हजारेंनी केली आहे.
अण्णा हजारेंनी पत्रात लिहिलं की, तुम्ही ‘स्वराज’ नावाच्या पुस्तकात अनेक आदर्श बाबींचा उल्लेख केला होता. त्यामुळे तुमच्याकडून आम्हाला खूप आशा होत्या. पण राजकारणात गेल्यानंतर आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर तुम्ही आदर्श विचारसरणीला विसरला आहात. जशी दारूची नशा असते, तशीच सत्तेची नशा असते. तुम्ही सत्तेच्या नशेत बुडून गेला आहात, असं दिसतंय.
दिल्ली सरकारच्या मद्य धोरणावर अण्णा हजारेंची टीका
अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांना लिहिलेल्या पत्रात दिल्ली सरकारच्या नवीन मद्य उत्पादन शुल्क धोरणावर टीका केली आहे. संबंधित धोरणामुळे भ्रष्टाचाराला खतपाणी मिळू शकते. राजकारणात गेल्यापासून तुम्हाला आदर्श विचारसरणीचा विसर पडला आहे, म्हणूनच तुमच्या सरकारने दिल्लीत नवीन मद्य धोरण आणलं आहे. यातून दारू विक्री आणि मद्यपानाला प्रोत्साहन मिळू शकतं. रस्त्यावर दारूची दुकाने सुरू केली जाऊ शकतात. त्यामुळे भ्रष्टाचाराला चालना मिळेल. हे जनतेच्या हिताचे नाही, अशी टीका अण्णा हजारेंनी केली आहे.
हेही वाचा- विश्लेषण : दिल्ली सरकारचे नवे मद्य धोरण काय आहे? या धोरणाला विरोध का होत आहे?
दिल्ली सरकारकडूनही अशा प्रकारचं धोरण अपेक्षित नव्हतं. पण आम आदमी पार्टीच्या दिल्ली सरकारने नवीन मद्य धोरण आणलं आहे. इतर राजकीय पक्षांप्रमाणेच तुम्हीही पैशांसाठी सत्ता आणि सत्तेसाठी पैसा या दुष्टचक्रात अडकल्याचे दिसत आहे. एका मोठ्या आंदोलनातून उदयाला आलेल्या राजकीय पक्षाला हे शोभत नाही, अशी टीका अण्णा हजारेंनी पत्राद्वारे केली आहे.