कधीकाळी अरविंद केजरीवाल यांनी ज्यांच्या नेतृत्वाखाली काम केलं, केंद्रातल्या काँग्रेस सरकारविरोधात आंदोलन देशव्यापी आंदोलन उभं केलं त्या अण्णा हजारे यांनी केजरीवाल यांना झालेल्या अटकेवर प्रतिक्रिया दिली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी (२१ मार्च) रात्री ईडीनं अटक केली. कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणात अरविंद केजरीवाल यांची ईडीकडून चौकशी चालू होती. या चौकशीदरम्यान ईडीनं केजरीवाल यांना तब्बल नऊ वेळा समन्सही धाडलं होतं. परंतु, केजरीवाल यांनी चौकशीला जाणं टाळलं, यासह त्यांनी समन्सला उत्तरदेखील दिलं नाही. अखेर गुरुवारी रात्री त्यांना ईडीनं अटक केली. या पार्श्वभूमीवर देशभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राजकीय वर्तुळात विरोधी पक्षांमधील नेत्यांकडून या कारवाईचा तीव्र शब्दांत निषेध केला जात आहे, तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून या अटकेचं समर्थन केलं जात आहे. दरम्यान, केजरीवाल यांचे गुरू अण्णा हजारे यांनी या अटकेवर प्रतिक्रिया दिली आहे.
अण्णा हजारे म्हणाले, अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्याचं वृत्त पाहून मला वाईट वाटलं. अरविंद केजरीवाल यांच्यासारखा माणूस कधी काळी माझ्याबरोबर काम करत होता. आम्ही दारुविरोधात आवाज उठवला होता. तोच माणूस आता मद्य धोरण बनवतोय, हे पाहून मला खूप दुःख झालं. परंतु, आपण आता काय करू शकतो? आपण सत्तेसमोर काहीच करू शकत नाही. त्यांनी जर त्या गोष्टी केल्या नसत्या (मद्य धोरण बनवणं किंवा कथित घोटाळा करणं) तर आज त्यांना अटक झाली नसती. त्यांना आता अटक झाली आहे. त्यामुळे पुढे जे काही होईल ते कायद्याने होईल अशी आपण अपेक्षा करुया. त्यांचं काय करायचं ते सरकार बघेल.
अण्णा हजारे हे पूर्वी केजरीवाल यांचे गुरू होते. अण्णा हजारे यांच्या जनलोकपाल आंदोलनात अरविंद केजरीवाल सर्वात पुढे होते. परंतु, आंदोलन चालू असतानाच केजरीवाल यांनी राजकारणात यायचं ठरवलं, त्यामुळे अण्णा हजारे आणि केजरीवाल यांच्यात बिनसलं. त्यानंतर या दोघांचे मार्ग बदलले. पुढे केजरीवाल यांनी आम आदमी पार्टी हा पक्ष काढला आणि आता हा पक्ष दिल्ली आणि पंजाबमध्ये सत्तेत आहे.
केजरीवाल यांचे जुने सहकारी आणि कट्टर समर्थक कुमार विश्वास काय म्हणाले?
कधीकाळी अरविंद केजरीवाल यांच्या पक्षात असणारे, त्यांचे कट्टर समर्थकच नव्हे, तर जिवाभावाचे मित्र असणारे कुमार विश्वास मध्यंतरी केजरीवाल यांच्याशी मतभेद झाल्यामुळे पक्षात अस्वस्थ झाले. हे मतभेद टोकाला गेल्यामुळे त्यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून ते केजरीवाल यांचे कट्टर समर्थक न राहता कडवे विरोधक बनले. वेगवेगळ्या व्यासपीठांवर कुमार विश्वास यांनी त्यांची परखड भूमिका स्पष्ट केली आहे. पेशानं कवी असणारे कुमार विश्वास यांचा स्वभावही कवीचाच असून त्यांची टीकाही त्याच पद्धतीने वेगवेगळ्या माध्यमातून समोर येत असते. आता केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर कुमार विश्वास यांनी केलेली सूचक पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. कुमार विश्वास यांनी त्यांच्या एक्स हँडलवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी थेट अरविंद केजरीवाल यांचं नाव घेतलं नसलं, तरी त्यांचा रोख त्याच दिशेनं असल्याचं बोललं जात आहे. या पोस्टमध्ये कुमार विश्वास यांनी रामचरितमानसमधील दोन ओळी नमूद केल्या आहेत. गोस्वामी तुलसीदास यांनी कर्माची महती या दोन ओळींमध्ये सांगितली असून केजरीवाल यांच्या कारवाईसंदर्भातच विश्वास यांनी या ओळी पोस्ट केल्याचं मानलं जात आहे.
हे ही वाचा >> “केजरीवालांची अटक भाजपासाठी बुमरँग ठरेल”, २०१५, २०२० च्या निवडणुकींचा दाखला देत शरद पवारांचं वक्तव्य
‘कर्म प्रधान विश्व रचि राखा, जो जस करहि सो तस फल चाखा’ असं कुमार विश्वास यांनी या पोस्टमध्ये लिहिलं आहे. हे विश्व कर्मप्रधान असून जी व्यक्ती जसं कर्म करते, त्या व्यक्तीला तसंच फळ मिळतं असा साधारण या ओळींचा अर्थ होतो. या ओळींसह कुमार विश्वास यांनी त्यांचा नतमस्तक झालेला एक फोटोही पोस्ट केला आहे. मात्र, ते नेमके कशासमोर नतमस्तक झाले आहेत, हे फोटोवरून कळून येत नाहीये.